पुणे : पुण्यात आता रिक्षाचा (auto rickshaw) प्रवास महागणार आहे. पहिल्या दीड किमीसाठी दोन रुपये तर त्या नंतरच्या प्रत्येक किमींसाठी १ रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. गुरुवारी पुणे आरटीओने (rto) रिक्षाच्या दरवाढीस मंजुरी दिली. ८ नोव्हेंबर पासून नव्या दराची अंमलबजावणी होणार आहे. यात पुणे,पिंपरी चिंचवड व बारामती शहरात नवे दर लागू होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढत्या इंधनदारामुळे व खटुवा समितीच्या शिफारसी लागू करण्याची रिक्षा संघटनेच्या मागणीमुळे आरटीओने ह्या दरवाढीस मान्यता दिली. दरवाढी संदर्भात आरटीओ कार्यालयात रिक्षा संघटनेसोबत बैठक देखील पार पडली होती. त्यात भाडेवाढ करण्याचे निश्चित झाले होते. पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात जवळपास ९० ते ९५ हजार रिक्षा आहेत.
रिक्षा दरवाढ सहा वर्षानंतर
सध्या पहिल्या दीड किमीसाठी १८ रुपये दर आकारले जात आहे. आता त्यासाठी वीस रुपये द्यावे लागतील. त्या नंतरच्या प्रत्येक किमीसाठी सध्या १२ रुपये दर आहे तो १३ रुपये करण्यात आला आहे. रिक्षा दरवाढ सहा वर्षानंतर झाली असल्याचे रिक्षा फेडरेशनचे बापू भावे म्हणाले तसेच हि दरवाढ गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.