पुणे : चौकाचौकात तसेच दुकानांमध्ये जाऊन तृतीयपंथीयांच्या वेशात भीक मागणारे आपल्याला दिसून येतात. त्यांच्याशी वाद नको, म्हणून अनेक जण त्यांना हवे ते पैसे देऊन मार्गी लावतात. तृतीयपंथीयांच्या शिव्याशाप नको, असा समज लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा फायदा घेऊन अनेक जण तृतीयपंथीयांचा वेश घेऊन लुटमार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार वानवडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. सिग्नलला एका तरुणाला लुटणारांना पकडले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
काशीनाथ मारुती सावंत (वय ३०) व रिक्षाचालक बबलु देवीदास पवार (वय ४०, दोघेही रा. शंकरमठ, मिरेकर वस्ती, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बबलु पवार हा रिक्षाचालक आहे. याप्रकरणी वानवडीत राहणाऱ्या एका २२ वर्षाच्या तरुणाने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली. फिर्यादी हे मंगळवारी सकाळी ११ वाजता मोटारसायकलवरून जात होते. घोरपडी येथील आर्मी पब्लिक स्कूलच्या गेटच्या पुढे घोरपडीकडे जाणाऱ्या सिग्नलला ते थांबले असताना एका तृतीयपंथीयाने त्यांच्याकडे २० रुपये मागितले. त्याला पैसे देण्यासाठी फिर्यादी तरुणाने पाकीट काढले असताना या तृतीयपंथीयाने १७ हजार रुपये असलेले पाकीट हातातून हिसकावून घेतले व तो रिक्षात बसून पळून गेला. या तरुणाने रिक्षाचा नंबर पाहिला होता.
वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक केंजळे यांनी तपास करून रिक्षाचालक बबलु पवार याला पकडले. त्यावरून काशीनाथ सावंत याला पकडण्यात आले. चौकशी करता सावंत हा तृतीयपंथीय नसतानाही तृतीयपंथीयांना भीक चांगली मिळते त्यामुळे तो साडी, ब्लाऊज घालून सिग्नलला भीक मागत असे. काशीनाथ सावंत याच्या रिक्षातून तो नेहमी जात असे. दोघांनी मिळून यापूर्वीही अनेकांना लुटले असल्याची शक्यता असून, पोलीस उपनिरीक्षक केंजळे अधिक तपास करीत आहेत.