पिंपरी: विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रिक्षावर कारवाई करणाऱ्या वाहतूक विभागाच्या महिला पोलिसाला शिवीगाळ व मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणला. तसेच विनयभंग केला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी येथे सोमवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली.
प्रल्हाद रामभाऊ कांबळे (वय ५१, रा. पिंपरी), अहनद मौल शेख (वय ३३, रा. गांधीनगर, पिंपरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागाच्या पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस या सोमवारी सकाळी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे वाहतूक नियमन करीत होत्या. त्यावेळी शेख नेहरू नगर येथून आंबेडकर चौकाकडे विरुद्ध दिशेने रिक्षा चालवत होता. त्यामुळे त्यांनी शेखला थांबून ड्रायव्हिंग लायसन्स व गाडीचे कागदपत्र दाखवण्यास सांगितले. त्याने कागदपत्र सादर केले नाहीत. त्यानंतर महिला पोलीस या त्याला पिंपरी वाहतूक विभागाच्या कार्यालयात घेऊन गेल्या. त्याच्यावर कायदेशीर खटला भरत असताना दुसरा आरोपी कांबळे तेथे आला. सरकारी काम करत असताना कांबळेने कामात अडथळा निर्माण केला. आतापर्यंत तुम्ही किती वाहनांवर कारवाई केली याची मला तात्काळ माहिती द्या. तुम्ही हे कशासाठी करता हे मला चांगले माहिती आहे. पोलीस लाचार आहेत. आम्हाला इथे कशासाठी आणले ते मला माहित आहे, असे कांबळे म्हणाला. तू जा रे येथून, ही काय करते मी पाहतो, असे कांबळेने शेख याला सांगितले. खटला भरण्याचे काम करत असताना कांबळेने शेख याला बाहेर काढले. तेथून पळवून लावले. त्यावेळी पोलीस या शेखला पकडण्यासाठी धावल्या असता कांबळेने फिर्यादीचे कॉलर पकडून मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून त्यांचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी तपास करत आहेत.