पुणे: इंधन दरवाढीमुळे रिक्षा प्रवास महागला आहे. येत्या २२ नोंव्हेबरपासून नवीन दरवाढ लागू होईल. आता रिक्षात बसताच नवीन दरानुसार २१ रुपयांचा मीटर पडेल. पुढील प्रत्येक किलोमीटसाठी 14 रुपये (पहिल्या दरापेक्षा अतिरिक्त 1 रुपया 69 पैसे) मोजावे लागतील. यापूर्वी मीटर १८ रुपयांनी सुरू होत होता.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड व बारामती यांची संयुक्त बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत नवीन दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्याच्या १८ रुपये भाडेदरात ३ रुपयांनी वाढ करून ती २१ रुपये करण्यात आली. पुढील प्रवासासाठी सध्याच्या १२.३१ भाडेदरात १ रुपया ६९ पैसे वाढ करून ती १४ रुपये करण्यात आली. महापालिका क्षेत्रात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत २५ टक्के अतिरिक्त भाडेदर आकारला जाणार आहे इतर ग्रामीण भागासाठी रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत ४० टक्के अतिरिक्त भाडेदर लागू राहणार आहे. तसेच प्रवाशांसमवेत असणाऱ्या सामानासाठी ६० बाय ४० सेमी आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या नगासाठी ३ रुपये शुल्क लागू राहणार आहे
मुदत समाप्तीनंतर ५० रुपये दंड-
दरवाढीनुसार रिक्षाधारकांना मीटर पुन:प्रमाणिकरण करण्यासाठी ३१ डिसेंबर, २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. जे रिक्षाधारक बदल मीटरमध्ये करून घेतील त्यांनाच ग्राहकांकडून नवीन दर घेता येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी सांगितले. मुदतीत पुनः प्रमाणिकरण न करणाऱ्यांना मुदत समाप्तीनंतर प्रत्येक दिवसाला ५० रुपये दंड द्यावा लागेल.