बारामती तालुक्यात यंदा पाण्याची मुबलक उपलब्धता; मागील वर्षी सुरू होते ४९ टँकर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 06:12 PM2020-05-04T18:12:57+5:302020-05-04T18:13:50+5:30
मागील वर्षी दुष्काळात होरपळणाऱ्या बारामती तालुक्यातील यंदाची पाणीपुरवठा स्थिती समाधानकारक
रविकिरण सासवडे-
बारामती : उन्हाळा म्हटलं की बारामती तालुक्यात टँकर असं समीकरण ठरलेलं आहे. तालुक्याच्या जिरायती भागात तर उन्हाळ्याचे चार महिने पाण्याच्या शोधात महिला-पुरुषांना पायपीट करावी लागते. मात्र, यंदा पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे अद्यापतरी जिरायती भागातील जनतेला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली नाही.
मागील वर्षी दुष्काळात होरपळणाऱ्या बारामती तालुक्यातील यंदाची पाणीपुरवठा स्थिती समाधानकारक आहे. मागील वर्षी मे महिन्यात तालुक्यात 33 गावे आणि 361 वाड्यावसत्या मधील 90 हजार 388 लोकसंख्येला 49 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र यंदा मे महिन्यात एकही टँकर मागणीचा प्रस्ताव प्रशासनाकडे आलेला नाही. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 424.9 मिलीमीटर एवढे आहे. मागील वर्षी पावसाने ही सरासरी ओलांडत विक्रमी आकडा गाठला. 606.6 मिलीमीटर पावसाची नोंद मागील वर्षी तालुक्यात झाली होती. हा पाऊस सरासरीच्या 142 टक्के एवढा झाला होता. पंचायत समितीच्या वतीने दिलेल्या माहिती नुसार 17 ते 18 वर्षात प्रथमच बारामती तालुक्यात एवढा पाऊस झाला होता. तालुक्यातील पाझर तलाव, वळण बंधारे, साठवन तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, खोलीकरण केलेले ओढे यामध्ये एकूण 654.71 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा झाला होता. यामुळे तालुक्यातील विहिरी, नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिवंत झाले. परिणामी उन्हाळ्या संपत आला तरी तालुक्यातुन अद्याप टँकरची मागणी झाली नाही. तालुक्यात सात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत.त्यापैकी कारखेल योजना बंद आहे. तर भिलारवाडी, साबळेवाडी, पानसरेवाडी आणि देऊळगाव रसाळ याठिकाणी स्रोत उपलब्ध नसल्याने योजना नाहीत. 99 ग्रामपंचायती पैकी 63 ग्रामपंचायतीमध्ये नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत.
अद्याप तरी टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले नाहीत. जून महिन्यात पावसाने ओढ दिली तर जिरायती भागात एखादा टँकर सुरू होईल. सध्या तरी तालुक्यात टँकर कोठेही सुरू नाही. पिण्याच्या पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याने समाधानकारक स्थिती आहे.
- एन. एस. ढवळे शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,बारामती पंचायत समिती