केरळच्या अवलियाला गड किल्ल्यांची भुरळ; ८ महिन्यांत १०८ किल्ले केले सर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 01:46 PM2022-12-29T13:46:48+5:302022-12-29T13:47:01+5:30

वर्षभरात ३४३ किल्ले सर करण्याचे ध्येय

Avaliyala of Kerala is fascinated by the forts Made 108 forts in 8 months sir | केरळच्या अवलियाला गड किल्ल्यांची भुरळ; ८ महिन्यांत १०८ किल्ले केले सर

केरळच्या अवलियाला गड किल्ल्यांची भुरळ; ८ महिन्यांत १०८ किल्ले केले सर

googlenewsNext

भोर : केरळच्या अवलियाला महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची भुरळ पडली आहे. मागील ८ महिन्यांत ६ हजार किलोमीटरचा प्रवास करून १०८ किल्ले सर केले आहेत, तसेच पुढील वर्षभरात ३४३ किल्ले सर करण्याचे त्याचे धेय आहे. हमरास एम.के. असे गडकिल्ले सर करणाऱ्या केरळच्या अवलियाचे नाव आहे.

हमरास भोर येथे आल्यानंतर जवाहर तरुण मंडळ चौपाटी, शिलेदार प्रतिष्ठान भोर, रोहिडा शिवजयंती उत्सव भोर व सकल मराठा समाजाच्या वतीने चौपाटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्याचे स्वागत करण्यात आले. त्याने भोर तालुक्यातील रोहिडा, रायरेश्वर, केंजळगड किल्ले सर केले आहेत.

१ मे, २०२२ पासून केरळावरून निघालेल्या हमरास एम.के. याने सायकलवरून सहा हजार किलोमीटर प्रवास करून महाराष्ट्रातील १०८ किल्ले सर केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील ३४३ किल्ले सर करण्याची जिद्द मनामध्ये ठेवून हमरासचा सायकल प्रवास सुरू आहे. सौदी अरेबियामध्ये ड्रायव्हरची नोकरी करणारा हमरास (वय २६) कोटपुराम, केरळ येथून सायकल प्रवासाला निघाला आहे. तिरंगा अभियान यात्रा व छत्रपती शिवाजी महाराज यांची केरळमध्ये अधिक माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने त्याने हा प्रवास सुरू केला आहे. घनदाट जंगल कडेकपारीतून वाट काढत किल्ल्यावर जाताना या प्रवासामध्ये आलेले अनुभव त्याने यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आणि दातृत्व फार मोठे असल्याचा अनुभव संपूर्ण प्रवासात मिळत आहे.

दरम्यान, प्रवासामध्ये महाराष्ट्रातील अनेक लोक मदत करतात, जेवणासाठीही विचारतात. प्रवासासाठी जिद्द हवी, पैशांची फारशी गरज लागत नाही. महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमी पुढे येऊन मदत करतात. महाराष्ट्राची संस्कृती मला प्रचंड आवडली. येथील लोक आपुलकीने वागतात. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्ल्यांची सफर करण्याचे ठरवून त्यांनी सफरीला सुरुवात केली आहे. लहानपणी सायकल चालविण्याची आवड व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याच्या कथांनी तो प्रेरित झाला होता. तेव्हापासून त्याने महाराजांचे किल्ले सर करण्याचा ध्यास घेतला. घनदाट डोंगर कपारी, जंगल, दरी यातून वाट काढत प्रवास करताना क्षणभर भीती निर्माण होत असते. मात्र, महाराजांनी त्या काळात हे गड, किल्ले कसे तयार केले असतील, याचा विचार करून पुढच्या प्रवासाला निघत असल्याचे दुर्गप्रेमी हमरास एम.के. याने यावेळी सांगितले.

हे किल्ले केले सर 

केरळच्या हमरास एम.के. या अवलियाने राजगड, तोरणा, प्रतापगड, लोहगड, विजापूर, सुधागड, सारसगड, मृगगड, हरिहर, कतरा, माहुली, आशेरी, गंभीर, तांदूळवाडी, कोहोज, रोहिडा, रायरेश्वर, केंजळगड असे १०८ किल्ले सर केले आहेत.

Web Title: Avaliyala of Kerala is fascinated by the forts Made 108 forts in 8 months sir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.