लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रोहित शिंदे टेनिस अकादमी, पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) आणि केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित चौदा वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या स्पर्धेत मुलांच्या गटात अवनीश चाफळेने, तर मुलींच्या गटात उर्वी काटेने विजेतेपद संपादन केले.
कर्वेनगर येथील स्वराज्यरक्षक संभाजी महाराज क्रीडा संकुलात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत मुलांच्या गटात तिसऱ्या मानांकित अवनीश चाफळेने दुसऱ्या मानांकित अर्जुन किर्तनेचा टायब्रेकमध्ये पराभव केला. अवनीश हा आठवी इयत्तेत विखे पाटील मेमोरियल शाळेत शिकत असून किर्तने टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक संदीप कीर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
मुलींच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित उर्वी काटेने दुसऱ्या मानांकित देवांशी प्रभुदेसाईचा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. तिचे हे या वर्षातील या गटातील पहिलेच विजेतेपद आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण विद्या आऊला, रोहित शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा निरीक्षक श्वेता कापशीकर या वेळी उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : अंतिम फेरी :
मुले :
अवनीश चाफळे (३) वि.वि. अर्जुन किर्तने (२) ५-४ (१), ५-३;
मुली :
उर्वी काटे (१) वि.वि. देवांशी प्रभुदेसाई (२) १-४, ४-२, ४-१.