पुणे : भीमा नदीपात्रात अगोदर तीन मृतदेह सापडले. त्यानंतर पुन्हा एक मृतदेह तरंगताना दिसला. हे मृतदेह नदीपात्रातून काढल्यानंतर पुढे आणखी तीन मृतदेह आढळून आले. एकामागोमाग सात मृतदेहांमुळे पोलिसही चक्रावून गेले. नक्की काय प्रकरण आहे ते त्यांनाही समजेना. आत्महत्या तर नाही, हे प्राथमिक अंदाजाने स्पष्ट झाले. मात्र, दुसरीकडे निघोज परिसरातून सात जण बेपत्ता असल्याची नोंद झाली होती. तपास करताना अनेक शक्यता व्यक्त केल्या गेल्या. त्यातूनच मुलाच्या अपघाती मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने नात्यातीलच सात जणांना यमसदनी पाठविल्याचे उघड झाले. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या तपासाचे धागेदोरे उलगडले.
प्राथमिक माहितीवरून पोलिसांना सर्वांची आत्महत्या असल्याचे वाटत होते. एकाच वेळी तीन मृतदेह आढळल्याने माध्यमांमध्ये बातम्यांचा सपाटा सुरू झाला. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर ते तिघेही एकाच घरातील असल्याचे समजले. नंतर केलेल्या शवविच्छेदन अहवालात या तिघांच्या मृत्यूचे कारण पाण्यात बुडाल्यामुळे झाला होता, असे समोर आले. चौथा मृतदेह सापडल्यानंतर ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा संशय बळावला. दुसरीकडे, निघोज परिसरातून सात जणांचे कुटुंब मिसिंग असल्याचे समोर आले. त्यातील चार जण तर सापडले होते; पण अजून तीन जण बाकी होते. पोलिसांनी भीमा नदीत युद्धपातळीवर शोधकार्य सुरू केले. त्यानंतर पुढे दीड किलोमीटरवर राहिलेले तीन मृतदेह सापडले. मृतांच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आणि गळा दाबल्याचे पुढे आले. निघोज व परिसरातील तपासातून फारसे काही पुढे आले नाही.
...अन् पोलिसांना संशय पक्का झाला
चौकशीसाठी पोलिसांनी मृतांच्या जवळच्या लोकांना यवत पोलिस स्टेशनला आणले. त्यामध्ये मृताचे चुलतभाऊ अशोक कल्याण पवार एकदम आत्मविश्वासाने पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. मृत मोहन उत्तम पवार आणि त्यांचे कुटुंब आम्हाला नेहमी त्रास द्यायचे. त्यांचे हे नेहमीचे आहे. ते रात्री कधी निघून गेले आम्हाला माहीत नाही. त्यांच्या मुलाने एक मुलगी पळवून आणली. त्यामुळे ते निघोज परिसर सोडून गेले, असे तो सांगत होता. मृताच्या मुलाने गावातील एका मुलीला पळवून नेल्याने त्या कुटुंबाने मृतांच्या घरी येऊन धमकी दिली होती. त्यामुळेच घाबरून त्यांनी आत्महत्या केली असेल, असे अशोक पवार याने सांगितले. ही सर्व माहिती देत असताना ती व्यक्ती एकदम विश्वासाने बोलत होती.
त्यावेळी पोलिसांना काही प्रश्न पडले ते असे-
- ज्यांना आत्महत्या करायची होती, ते घरातील सामान घेऊन का गेले?
- जरी त्यांनी रस्त्यात ठरवलं की, आत्महत्या करायची तर ते सामान कुठे गेले?
- आत्महत्या करण्यासाठी इतक्या लांब का आले?
असे आले समाेर कारण...
त्याच वेळी पुणे शहर पोलिसांत एक अपघाताचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. त्यामध्ये अशोक कल्याण पवार यांचा मुलगा धनंजयचा अपघातात मृत्यू झाल्याची नोंद होती. ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी मृत मोहन उत्तम पवार यांचा मुलगा अनिल हा धनंजयसोबत होता. त्यामुळे अनिलवर अशोक पवार आणि त्यांच्या भावांचा डोळा होता. या गुन्ह्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपासाला गती आली. जी व्यक्ती पोलिसांनी एवढ्या विश्वासाने उत्तरे देत होती, तीच मुख्य आरोपी होती, हे नंतर समजल्यावर पोलिसांनाही धक्का बसला होता. आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आरोपींनी सामूहिक हत्याकांड घडवून आणले होते. आरोपींमध्ये अशोक कल्याण पवार (वय ३९), शंकर कल्याण पवार (वय ३७), श्याम कल्याण पवार (वय ३५), प्रकाश कल्याण पवार (वय २४) व कांताबाई सर्जेराव जाधव (वय ४५) यांचा समावेश आहे. हे सर्व जण भाऊ-बहीण असून ते हे मृत मोहन उत्तम पवार यांचे चुलतभाऊ होत.
कसा घडला हत्याकांड?
निघोजने रात्री साडेनऊच्या सुमारास ते बीडला पिकअपने जाण्यासाठी निघाले. आरोपीचा मुलगा धनंजयचा मृत्यू आणि मृताचा फरार मुलगा अनिल या विषयावर चर्चा करण्यासाठी ते सर्व जण बीडला निघाले होते. निघोजजवळ गाडी डिझेल भरण्यासाठी थांबली. सगळे जण गाडीच्या पाठीमागे हौदात बसले होते. गाडी नगर- पुणे महार्गावरील कानिफनाथ फाट्याकडून केडगाव-चौफुल्याकडे निघाली. या रस्त्यावरच चालत्या गाडीत या सर्वांना गळा दाबून मारून टाकले. रात्री १ वाजता सर्वांचे मृतदेह पुलावरून नदीत टाकले. मृत मोहन उत्तम पवार (वय ४५), पत्नी संगीता ऊर्फ शहाबाई (वय ४०), मुलगी राणी फुलवरे (वय २४), जावई श्याम फुलवरे (वय २८), नातू रितेश (वय ७), छोटू (वय ५), कृष्णा (वय ३) यांचा शेवटचा प्रवास ठरला. आरोपींनी ६ जणांना गळा दाबून मारले होते. तर सर्वांत लहान असणारा कृष्णा शांत बसल्याने त्याचा गळा दाबला नव्हता. आरोपींनी सर्व सहा मृतदेह भीमा नदीत टाकल्यानंतर कृष्णालाही जिवंतच पाण्यात टाकले होते.
या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला.