पुणे : रिक्षाचालक ते देशातील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक असा अविनाश भोसले यांचा प्रवास राहिलेला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून आत्तापर्यंत अनेकदा चौकशी झाली; मात्र भोसले यांना अटक प्रथमच झाली आहे.
अविनाश भोसले हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील. नोकरीच्या शोधात पुण्यात आले. पुण्यातील रास्ता पेठेत भाड्याच्या घरात राहू लागले. गुजराण करण्यासाठी रिक्षा चालवायला सुरूवात केली. त्यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीस होते. या माध्यमातून त्यांची बांधकाम क्षेत्रातील लोकांशी ओळख झाली. सुरूवातील रस्त्याची छोटी- मोठी कंत्राटे ते घेऊ लागले. राज्यात १९९५ साली शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे राज्य आल्यावर भोसले यांचा खऱ्या अर्थाने उत्कर्ष सुरू झाला. कृष्णा खोरे पाणीवाटपाच्या लवादाच्या पाश्वभूमीवर राज्यातील युती सरकारने कृष्णेचे पाणी अडविण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला होता. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्याची अनेक कामे अविनाश भोसले यांनी केली. यासाठी सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी संवाद साधण्याचे आणि त्यांना आपलेसे करून घेण्याचे त्यांचे कसब उपयोगी पडले. त्यामुळे १९९९ साली राज्यात सत्ताबदल झाल्यावरही कंत्राटांच्या पातळीवर त्यांची घौदौड सुरूच राहिली.
अविनाश भोसले यांच्या घरात राहिले होते ब्रँडाेजोली
अविनाश भोसले यांचा पुण्यातील बाणेर परिसरातील प्रचंड मोठा आलिशान बंगला नेहमीच चर्चेत असतो. अगदी हेलीपॅडची व्यवस्था या बंगल्यात आहे. पुण्यात २००६ साली हॉलिवूडचे प्रसिद्ध दांपत्य अभिनेत्री अँजेलिना जोली आणि अभिनेता ब्रॅड पिट आले होते. एका चित्रपटाचे शुटींग पुण्यात होते. यावेळी त्यांची राहण्याची व्यवस्था अविनाश भोसले यांच्या बंगल्यात करण्यात आली होती.
२००७ सालीही झाली होती अटक
अविनाश भोसले यांना अटक होण्याची ही दुसरी वेळ आहे. २००७ साली मुंबई विमानतळावर त्यांना कस्टम विभागाकडून अटक करण्यात आली. लंडनहून येताना आणलेल्या महागड्या वस्तू आणि परदेशी चलन अविनाश भोसलेंनी कस्टम ड्युटी चुकवुन एअरपोर्टच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांचावर आरोप होता. फेमा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती, मात्र, या प्रकरणातून त्यांची सुटका झाली होती. २०१७ सालीही आयकर विभागाने अविनाश भोसले यांच्या घरी छापा टाकला होता.
पुण्यात पंचतारांकित हॉटेलची उभारणी
रस्ते, धरणे, पूल उभारणी यासह अविनाश भोसले यांच्या एबीआयएल कंपनीने अनेक क्षेत्रांत विस्तार केला आहे. पुण्यात कोरेगाव पार्क परिसरात भोसले यांचे ‘वेस्टीन’ हे हॉटेल आहे. या हॉटेलच्या उद्घाटनाला तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरद पवार ,गोपीनाथ मुंडे, पतंगराव कदम, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहिले.
ठाकरे कुटुंबाशी जवळीक
अविनाश भोसले यांची ठाकरे कुटुंबाशी जवळीक आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ या पुस्तकासाठी एरीअल फोटोग्राफी केली आहे. या पुस्तकामध्ये ठाकरे यांनी अविनाश भोसले यांनी हेलीकॉप्टर उपलब्ध करून दिले असा उल्लेख केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा पुण्यात यायचे तेव्हा अविनाश भोसले स्वतःची गाडी घेऊन बाळासाहेब ठाकरे यांचे सारथ्य करायचे, असेही बोलले जायचे.
विश्वजित कदम जावई
माजी मंत्री आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम यांचे चिरंजीव आणि राज्याचे मंत्री विश्वजित कदम हे अविनाश भोसले यांचे जावई आहेत. भोसले यांच्या कन्या स्वप्नाली यांचा विवाह विश्वजित यांच्याशी झाला आहे.
अविनाश भोसले यांची हेलीकॉप्टर कायम चर्चेत
अविनाश भोसले यांच्या मालकीची हेलीकॉप्टर कायमच चर्चेचा विषय असतात. त्यांच्याकडे तीन हेलीकॉप्टर आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या हेलीकॉप्टरमधूनच एरीअल फोटोग्राफी केली होती. त्याचबरोबर आषाढी वारीच्या काळात त्यांच्या हेलीकॉप्टने पालखीवर पुष्पवृष्टी होते. बेल ४०७, बेल ४२७ और ऑगस्टा १०९ ही तीन हेलीकॉप्टर त्यांच्याकडे आहेत. असे म्हणतात की अविनाश भोसले हे आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी रविवारी हेलीकॉप्टरने जातात. बाणेरपासून सुमारे २० किलोमीटर असलेल्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानावर ते क्रिकेट खेळायला हेलीकॉप्टर घेऊन जायचे.