दौंड : शासन आणि समाज यांच्या समन्वयातून आंदोलनासंदर्भात निर्णय झाला पाहिजे; मात्र या निर्णयातून समाजाची तसेच सार्वजनिक मालमत्तेची हानी होता कामा नये. यासाठी विविध राजकीय पक्षांनी तसेच संघटनांनी आंदोलनात्मक भाग म्हणून शहर बंद करण्याचे टाळावे, असे आवाहन प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी केले. दौंड येथे शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली होती, त्या वेळी ते बोलत होते. फेसबुकवर राष्ट्रीय पुरुषांचा अवमान करण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. त्यातून तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत आहे. राष्ट्रीय पुरुषांचा अवमान होणे ही बाब अशोभनीय आहे. तर, राजकीय आणि सामाजिक संस्थांनी अफवावर विश्वास ठेवू नये. तातडीने सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते, प्रतिष्ठित व्यक्ती यांची समिती नेमण्यात येणार असून, ती शहर बंदबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे शेवटी शिंगटे म्हणाले. पोलीस निरीक्षक सजन हंकारे म्हणाले, की निषेध करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत; मात्र गाव बंद ठेवून काही साधले जात नाही. याउलट, तणाव निर्माण होऊन हातावर पोट असलेल्या मजुरांचे नुकसान होते. तसेच, अडीअडचणींना बंदच्या काळात समाजातील विविध घटकांना सामोरे जावे लागते. याचा विचार राजकीय पक्ष आणि संघटनांनी करावा, असे शेवटी ते म्हणाले. या वेळी भास्कर सोनवणे, राजेंद्र ओझा, राजेंद खटी, आबा वाघमारे, भारत सरोदे, बादशहा शेख, विकास कदम, राजू बारवकर, सचिन कुलथे, रवी कुलकर्णी, सुनील शर्मा, छगन परमार यांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार उत्तम दिघे यांनी आभार मानले. या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
‘बंद’ टाळावेत!
By admin | Published: June 15, 2014 4:15 AM