लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दरवर्षी ढोल-ताशांच्या गजरात अन् गणरायाच्या जयघोषात वैभवशाली गणेशोत्सव साजरा केला जातो. पण, कोरोनाच्या सावटाखाली मागील वर्षीप्रमाणे यंदाही सर्व नियमांचे पालन करत लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात गणरायाच्या आगमनानिमित्त गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सकाळपासूनच होणार आहे.
यंदा मंडळांच्या बैठकीत गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत एकमत झाले आहे. जिल्ह्यात काही गणेश मंडळांनी भाविकांसाठी २४ तास ऑनलाईन दर्शनाची सुविधा केली आहे. गणेशोत्सवाची ओळख असणारे सांस्कृतिक कार्यक्रमही फेसबुक व यू ट्यूूबवरून प्रक्षेपित करण्याचे नियोजन आहे.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. प्रात:कालापासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टीकरण, इ. वर्ज्य नाहीत. शुक्रवार, १० सप्टेंबर रोजी पहाटे ४.५० वाजल्यापासून दुपारी १.५०पर्यंत कधीही घरगुती गणेशाची स्थापना करता येईल, असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे. अनेकजण दरवर्षी उत्सवासाठी आपल्या गावी जात असतात. यावर्षी गावी जाणे शक्य नसल्यास त्यांनी राहत्या घरी गणेशोत्सव करून गणेश पूजनाची परंपरा अखंडित ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.
पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्यादिवशी न जमल्यास पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. एखाद्या वर्षी काही कारणाने लोप झाल्यास पुन्हा पुढील वर्षी गणपती पूजन करता येते. दुकानातून गणपतीची मूर्ती ८-१५ दिवस आधी आणून घरामध्ये ठेवता येते. भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून ज्येष्ठा नक्षत्राचे दिवशी गौरी पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. अनेकांकडे गौरीपुढे नैवेद्य दाखवून ताट दिवसभर ठेवून दुसऱ्या दिवशी खाण्याची प्रथा आहे. मात्र, कोणत्याही देवतेला नैवेद्य समर्पण केल्याबरोबर त्या देवतेने नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेच प्रसाद म्हणून तो आपण घेऊ शकतो, असेही दाते यांनी सांगितले.
घरामध्ये गर्भवती स्त्री असतानाही गणपती विसर्जन करावे. अशावेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. प्राणप्रतिष्ठा करून बसवलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हाऱ्यातून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे, असे नसून पाण्यात विसर्जन करावे, असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा तत्सम पाण्यात न विरघळणाऱ्या पदार्थांची मूर्ती नसावी.
————————-
गणेशोत्सवातील महत्त्वाचे दिवस
१० सप्टेंबर रोजी पहाटे ४.५० वाजल्यापासून दुपारी १.५०पर्यंत गणेश प्रतिष्ठापना
१२ सप्टेंबर, रविवारी सकाळी ९.५०नंतर परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.
१३ सप्टेंबर, सोमवार गौरी पूजन
१४ सप्टेंबर, मंगळवारी गौरी विसर्जन - सकाळी ७.०५नंतर गौरी विसर्जन करावे. मंगळवार असला तरीही गौरी विसर्जन परंपरेप्रमाणेच करावे.
१९ सप्टेंबर, रविवार अनंत चतुर्दशी