पुणे : गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी आलेले नागरिकांनी वीजयंत्रणेपासून दूर रहावे आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे, मिरवणूकीतील वाहनांचा वीज वितरण यंत्रणेला स्पर्श होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. मुख्य मिरवणुक रस्त्यावर दक्षतेसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जनाच्या कालावधीत मिरवणुकीतील वाहने, देखावे उच्च व लघुदाब वाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर अशा वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर राहतील याची काळजी घ्यावी. तसेच, लहान मुले आाणि नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी वीजयंत्रणा अथवा फिडर पिलरवर चढू नये, त्याचा आधार घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. मिरवणुकी दरम्यान पथदिवे, फिडर पिलर अथवा अन्य कोणत्याही वीजयंत्रणेला स्पर्श करू नये. कोणी असा प्रयत्न करीत असेल तर त्या व्यक्तीस वीजयंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर जाण्यास भाग पाडावे असे आवाहन करण्यात आले आहे.पुणे परिमंडलातील गणेश विसर्जनाच्या कालावधीत मोबाईल व्हॅनसह महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांचे पथक उपलब्ध राहणार आहे. शहरातील महत्त्वाच्या लक्ष्मी रस्ता व टिळक रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी परिसरात महावितरणचा तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येत आहे. अभियंते व जनमित्रांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली असून मिरवणुक संपेपर्यंत हा नियंत्रण कक्ष सुरु राहणार आहे. गणेश विसर्जनाच्या कालावधीत विद्युत सेवेबाबत काही अडचणी आल्यास अथवा अन्य माहिती द्यावयाची असल्यास संबंधित परिसरातील अभियंते आणि महावितरणच्या १९१२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा १८००१०२३४३५ अथवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
विसर्जन मिरवणुकीत वीज विघ्न टाळा..! महावितरणचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 5:38 PM
सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जनाच्या कालावधीत मिरवणुकीतील वाहने, देखावे उच्च व लघुदाब वाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर अशा वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर राहतील याची काळजी घ्यावी.
ठळक मुद्देविसर्जनकाळात स्थापणार नियंत्रण कक्षमोबाईल व्हॅनसह महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांचे पथक उपलब्ध राहणार