वाकी बुद्रुक : आपल्याकडे लग्नसोहळ्यात अमाप खर्च होतो आहे. हा व्यर्थ खर्च टाळून आपण दानधर्म करावा, अशा प्रकारचा महत्त्वाचा संदेश समाजभूषण निवृत्तीमहाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी दिला.
खेड तालुक्यातील मोठा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी वाटेकरवाडी येथे होत असतो. दरवर्षी समाजभूषण निवृत्तीमहाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होते. यंदा शनिवारी दि.५ रोजी या सप्ताहाची सांगता करण्यात आली. अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त नवनाथ महाराज पारायण सोहळाही पार पडला. सप्ताहातील कीर्तनमालेत प्रसादमहाराज माटे, प्रकाश महाराज पवार, पोपट महाराज राक्षे, ज्ञानेश्वर महाराज रासकर, गणेश महाराज डांगे, लक्ष्मण महाराज पाटील यांची कीर्तने झाली. सांगता समारोपाच्या कीर्तनात इंदोरीकर महाराज यांनी सामाजिक प्रश्नावर भाष्य करत उपस्थित समाजाला शालजोडे दिले. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर सर्वांसाठी अन्नप्रसादाचे आयोजन कानिफनाथ मित्र मंडळाने केले होते. काल्याच्या कीर्तनासाठी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे,पंचायत समिती व बाजार समिती सदस्य ज्योती अरगडे, युवा नेते विजयसिंह शिंदे, काळूसचे सरपंच यशवंत खैरे तसेच अनेक मान्यवर, वाकी बुद्रुक, शिरोली, खरपुडी, भोसे तसेच काळूस गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.