पुणे : चौकशीला सामोरे जाऊन कारवाई टाळण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आजाराला कवटाळल्याची चर्चा आहे. तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्याकडून होणाऱ्या कारवाईचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्यांनी ही ‘चलाखी’ केली आहे. त्यातील काही जण मुंढे यांची बदली झाल्यानंतर कामावर पुन्हा रूजु झाल्याचे समजते.मुंढे यांनी काही बेशिस्त अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला होता. बडतर्फी, निलंबन, दंडात्मक कारवाई यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले होते. टप्प्याटप्याने अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई होत होती. काही जण त्यांच्या रडारवर होते. त्यामुळे काहींनी वैद्यकीय कारण देत घरी बसणे पसंत केले. वैद्यकीय रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याची सक्ती नसते. ते कामावर पुन्हा रुजू झाल्यानंतर चौकशी केली जाते. मात्र, अनेकदा वैद्यकीय कारणास्तव चौकशीचा ससेमिरा टळतो. याचाच फायदा घेत काहींनी मुंढे यांच्या कारवाईला सामोरे जाण्याआधीच आजाराला कवटाळल्याची चर्चा ‘पीएमपी’ वर्तुळात आहे. मुंढे यांच्या बदलीनंतर मात्र त्यांचा आजार पळाला असून काही जण तीन-चार दिवसांत कामावर पुन्हा रुजूही झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. मुंढे यांच्या कार्यकाळात त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्यापुर्वीच त्यांनी वैद्यकीय कारण देत रजा घेतली. ‘पीएमपी’ प्रशासनाकडून चौकशीसाठी सातत्याने बोलाविण्यात आले. मात्र, प्रत्येकवेळी वैद्यकीय रजेचे कारण देण्यात आले. त्यामुळे त्यांची चौकशीच झाली नाही. मुंढे असताना हमखास कारवाई होणार या भीतीपोटी संबंधितांकडून कामावर रुजू होणे टाळल्याचे दिसून येते. ज्यांची यापुर्वी चौकशी सुरू होती मात्र, वैद्यकीय रजेमुळे ती पुर्ण झाली नाही, त्यांची रुजू झाल्यानंतर पुन्हा चौकशी सुरू केली जाते. आता मुंढे नसल्याने कारवाईची तीव्रता सौम्य होण्याची किंवा कारवाई टळण्याची खात्री संबंधितांना आहे, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे संबंधितांबाबत काय भुमिका घेणार, मुंढे यांच्याप्रमाणेच बेशिस्तांवर कडक कारवाई करणार का? अशी चर्चा पीएमपी वर्तुळात सुरू आहे.----------------
चौकशीचा ससेमिरा नको म्हणून ‘ त्यांनी ’ कवटाळले आजाराला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 7:41 PM
पीएमपी : तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या काळात अधिकारी-कर्मचाऱ्यांची चलाखी केली आहे.
ठळक मुद्देबडतर्फी, निलंबन, दंडात्मक कारवाई यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले होते.बडतर्फी, निलंबन, दंडात्मक कारवाई यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले होते. वैद्यकीय रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याची सक्ती नसते.