पिंपरी : सन २०२३ च्या सर्वेनुसार शहरातील सर्व टपरी, पथारी, हातगाडीधारकांना येत्या पंधरा दिवसात आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर परवाना द्या. अन्यथा पिंपरी चिंचवड महापालिकेला टाळा ठोकून महापालिका कामकाज बंद पाडू, असा गंभीर इशारा टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला. टपरी, पथारी, हातगाडीधारकांच्या प्रश्नांवर संघटनेच्या वतीने बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महापालिका मोर्चा काढण्यात आला. यावेळी बाबा कांबळे बोलत होते.
बाबा कांबळे म्हणाले की, या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशातील गोरगरीब, कष्टकरी, बहुजन, मागासवर्गीय कष्टकरी शेतमजूर यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणपणाने लढा दिला. आता अनेकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. परंतु स्वातंत्र्य काळामध्ये गोरगरीब कष्टकरी, मागासवर्गीय, बहुजन यांच्या अवहेलना चालूच आहेत. श्रमाला प्रतिष्ठा मिळत नाही. पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरीब, कष्टकरी, टपरी, पथारी हातगाडी धारकरकांवर सतत अन्यायकारक कारवाई होत आहे. महापालिका प्रशासनाकडे सातत्याने प्रश्न सोडवण्याबाबत मागणी केली होती. निवेदनही सादर केले होते. मात्र नकारात्मक तोडगा निघत नाही. त्यामुळे हा मोर्चा काढण्याची वेळ आली. आगामी काळात अधिक आक्रमक आंदोलन करून मागण्या मान्य करायला भाग पाडू.
संघटनेच्या वतीने मांडलेल्या मागण्या
१) पुनर्वसन केल्याशिवाय अतिक्रमण कारवाई करू नये. २) 2023 मध्ये सर्वेक्षण झालेल्या सर्व लाभार्थ्यांना तातडीने परवाना द्या. ३) पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पात्र टपरी, पथारी, हातगाडी, फळभाजी विक्रेते यांचे पक्क्या गळ्यात पुनर्वसन करा. त्या ठिकाणी लाईट, पाणी, स्वच्छता गृह आदी सुविधा द्या.४) फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा. ५) टपरी पथारी हातगाडी धारकांना सामाजिक सुरक्षा द्या.६) पीएम स्वनिधीद्वारे एक लाख रुपये कर्ज व त्यात ५० टक्के अनुदान सुरू करा. ७) टपरी, पथारी, हातगाडी धारकांना आरोग्य विमा अपघाती विमा व इतर कल्याणकारी योजना सुरू करा. ८) शहरात प्रथम व सर्वात मोठी संघटना म्हणून टपरी, पथारी; हातगाडी पंचायत या संघटनेस विश्वासात घ्या. ९) स्मार्ट सिटी व स्ट्रीट वेंडर्स योजने अंतर्गत शहरातील सर्व हातगाडी व टपरीधारकांना महापालिके मार्फत आधुनिक पद्धतीने हातगाडी व स्टॅन्ड उपलब्ध करून द्या. इतर विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.