लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : दहा लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या भोसरीतील रंगनाथ शिक्षण विकास मंडळाच्या भैरवनाथ शाळा व शाहूनगर येथील अभिषेक विद्यालयाला पिंपरी महापालिकेच्या करसंकलन विभागाने टाळे ठोकले. यामुळे थकबाकीदार शैक्षणिक संस्था चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.पालिका हद्दीत दहा लाखांपेक्षा जास्त मिळकत कर थकबाकी असणाऱ्या तब्बल ३६ शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांना वारंवार मिळकत कराची रक्कम भरण्यास महापालिकेने आवाहन केले. मात्र, त्याला कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे करसंकलन विभागाने बुधवारपासून जप्तीची कारवाई सुरू केली आहे. मिळकत जप्त केलेल्या शैक्षणिक संस्थांनी मिळकत कराची थकबाकीची रक्कम भरणा न केल्यास मिळकतींची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार लिलावाची कारवाई करण्यात येणार आहे. भोसरीतील रंगनाथ शिक्षण विकास मंडळाच्या भैरवनाथ शाळेची एक कोटी २२ लाख ९६ हजार ७९१ रुपयांची मिळकत जप्त केली आहे. तर, शाहूनगर येथील अभिषेक विद्यालयाची ४९ लाख २५ हजार २४३ रुपयांची मिळकत जप्त केली आहे. ताथवडेमधील जयवंत इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीजचे ब्लॉसम पब्लिक स्कूल व काळेवाडीमधील बेबीज इंग्लिश स्कूल या शैक्षणिक संस्थांनी मार्चअखेरची थकबाकी अनुक्रमे पंधरा लाख ७७ हजार ७८४ रुपये व १६ लाख ७४ हजार ६५० असे एकूण ३२ लाख ५२ हजार ४३४ रुपयांचा भरणा केला आहे.
करबुडव्या शिक्षण संस्थांना टाळे
By admin | Published: May 25, 2017 2:55 AM