पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गर्दी होण्याची शक्यता आहे. नाईट क्लब, पब, हॉटेलकडून नियम धाब्यावर बसविले जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता ३१ डिसेंबरच्या रात्री सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
शहरात कोरोना परिस्थिती आवाक्यात आहे. परंतु, हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती बिघडण्यास वेळ लागणार नाही. निष्काळजीपणा झाल्यास दुसरी लाट लवकर येऊ शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे काळजी घेणे प्रत्येक नागरिकाचे काम आहे. सध्या हॉटेलांसाठी ५० व्यक्तींची आणि रात्री ११ नंतर हॉटेल बंद करणे बंधनकारक आहे. परंतु, या नियमाचे पालन केले जात नाही. याबाबत पालिकेकडे तक्रारी प्राप्त होत आहेत.
दरवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री फर्ग्युसन रॉड, झेड ब्रिज, नामदार गोपाळकृष्ण गोखले चौक (गुडलक हॉटेलजवळ) आणि कल्याणीनगर, लष्कर, कोरेगाव पार्क आदी परिसरात मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी होत असते. यंदा गर्दी झाल्यास, नागरिक विनामास्क एकत्र आल्यास कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची भिती असल्याचे मोहोळ म्हणाले.