मंचर:मागील आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून नागरिकांनी लग्नकार्य,दशक्रिया,वरात तसेच आगामी काळातील सण, यात्रा या गोष्टी शक्यतो टाळावेत.त्यामुळे नक्कीच कोरोनाला आवर घालता येईल.तालुक्यात रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याबाबत नियोजन करण्याचे आदेश कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत.
अवसरी फाटा येथे आयोजित कोरोना आढावा बैठकी प्रसंगी वळसे-पाटील बोलत होते. यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम,उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, तहसीलदार रमा जोशी,गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंबादास देवमाने,पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पवार आदी उपस्थित होते.
वळसे-पाटील म्हणाले, तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून कोरोनाचे रूप बदलत आहे. कुटुंबच्या कुटुंब बाधित होत असून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क वापरने, सोशल डिस्टंसिंग नियम पाळणे याकडे दुर्लक्ष करू नये. लग्नकार्य,दशक्रिया विधी, वरात या गोष्टी टाळाव्यात. पुढील महिन्यात आणखीन रुग्ण वाढू शकतात. यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. महसूल व पोलिस प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या कोरोना बाधित रुग्णांचे बिल हे शासनाने निर्धारित केलेल्या रकमे प्रमाणेच घ्यावे. यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे. शासनाचे नियम न पाळणारे हॉटेल, धाबे,दुकाने, नागरिक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर तालुक्यात मंचर उपजिल्हा रुग्णालय, घोडेगाव ग्रामीण रुग्णालय व सात प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण चालू असून नागरिकांना लस उपलब्ध करून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.
२० मंचर