पुणे: कोरोनाने सगळे शहर अडचणीत आणले आहे. अशा वेळी आरोग्यसेवेवर खर्च करण्याऐवजी अनावश्यक विकासकामे केली जात आहेत, ती टाळा असे आवाहन पतितपावन संघटनेने महापालिका आयुक्तांना केले आहे.
पदपथांचे चांगले असलेले ब्लॉक काढून तिथे नवे टाकणे यासाठी ३ ते ५ लाख रुपये प्रत्येक प्रभागात यात कसले विकासकाम आहे, असा प्रश्न संघटनेचे पदाधिकारी स्वप्निल नाईक यांनी आयुक्तांना केला आहे. याऐवजी शहरात आरोग्यसेवेचे जे धिंडवडे निघत आहेत, त्याकडे लक्ष द्यावे, जास्तीत जास्त पैसे आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर खर्च करावेत अशी मागणी संघटनेने केली आहे.
बेडची उपलब्धता, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन या गोष्टींसाठी नागरिकांचे पैसे खर्च झाले पाहिजेत, ही जबाबदारी आयुक्त म्हणून तुमचीच आहे असे निवेदनात म्हटले आहे. आयुक्तांसह महापौर व अन्य पदाधिकार्यांंनाही निवेदन देण्यात आले. संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, प्रांत संघटक सिताराम खाडे, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास मनेरे, स्वप्नील नाईक, धनजंय क्षीरसागर, मनोज पवार, संतोष शेंडगे, विजय गावडे, विजय क्षीरसागर यावेळी उपस्थित होते.