तळवडे : खरं पाहायला गेलं, तर विवाहसोहळा हा एक संस्कार; पण याच विवाहसोहळ्याला आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याचा मंच काही जण समजत आहेत. मात्र, चिखली येथील साने परिवार याला अपवाद ठरला असून, या परिवाराने लग्नातील अनाठायी खर्च टाळून सामाजिक बांधिलकीचे भान जपत समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या सामाजिक संस्थांना सुमारे दहा लाखांची मदत करण्याचे ठरविले आहे.लग्नात डी.जे. साउंड, उंट, घोडे, ढोल, ताशे, मानपान, लग्नपत्रिका, वर राजाची मिरवणूक, मोठे मंगल कार्यालय, अनावश्यक सजावट, फटाके यावर होणारा खर्च किती तरी लाखात जात असतो. यासाठी ऐपत नसतानाही नातेवाईक, तसेच ओळखीच्या लोकांकडून हातउसने पैसे घेऊन, प्रसंगी कर्ज काढून हौस करणाऱ्या लोकांची समाजात कमी नाही.चिखली येथील वैभव साने आणि मलठण (ता. शिरूर) येथील स्वाती महाले यांचा विवाह होणार आहे. पण, लग्नात होणारा अनाठायी खर्च टाळून क्षणिक सुख देणाऱ्या हौसेला मुरड घालून एखाद्याच्या आयुष्यात चिरकाल सुख निर्माण करण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून दुष्काळग्रस्तांसाठी काम करणाऱ्या नाम फाउंडेशन, अनाथांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचे कार्य करणाऱ्या विकास अनाथाश्रम, गावातील शाळेसाठी मंदिर उभारणी, वृद्धांना मोफत देवदर्शन करण्यासाठी, गोशाळा उभारणी इदिरानगर घरकुल वसाहत चिखली येथे घर तेथे मोफत नळकनेक्शन देणे यांसारख्या समाजोपयोगी कामास सुमारे दहा लाखांची मदत करण्याचे चिखली येथील साने परिवाराने ठरवले आहे. (प्रतिनिधी)
लग्नाचा खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम
By admin | Published: April 30, 2016 1:11 AM