अवसरी बुद्रुक गावच्या दक्षिणेला हिंगेमळा परिसर आहे. परिसरातून डिंभे धरणाच्या उजवा कालवा गेल्याने या परिसरातील सर्वत्र शेती बारमाही बागायत आहे. या ठिकाणी अनेक वेळा बिबट्याने हल्ला केल्याच्या अथवा दर्शन दिल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास विष्णू हिंगे व सागर हिंगे यांच्या पोल्ट्रीमध्ये उडी मारल्याचा आवाज आल्याने निवृत्त लेफ्टनंट कमांडर अभिजित हिंगे यांनी तत्काळ सागर हिंगे यांना फोन करून घटना सांगितली. अभिजित हिंगे व सागर हिंगे यांनी तत्काळ आपल्या चारचाकी वाहनात बसून पोल्ट्रीपासून बिबट्याला पळविण्यासाठी चारचाकी वाहनाचा प्रखर उजेड टाकून पळविण्याचा प्रयत्न केला. काल त्यांच्या ५०० गावठी कोंबड्या बचावल्या आहेत. याठिकाणी बिबट्याची मादी व दोन मोठे बछडे हिंगे यांना आढळून आले आहेत.
मागील १५ ते २० दिवसांपासून या परिसरात बिबट्याने शंभर ते सव्वाशे कोंबड्या, वसंतराव हिंगे यांचा डॉबरमॅन कुत्रा, १३ जून रोजी भरत रमाजी हिंगे यांचे गायीचे वासरू बिबट्याच्या जोडीने फस्त केले आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्याची दहशत आहे. स्थानिकांनी वन विभागाशी अनेक वेळा संपर्क केला. तसेच ग्रामपंचायतीमार्फत पत्रव्यवहार करून बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी केली. मात्र वनखाते त्यांच्या हल्ल्याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. अवसरी बुद्रुक ग्रामस्थांनी हिंगेमळा येथे तत्काळ पिंजरा बसवण्याची मागणी केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील हिंगेमळा परिसरात बिबट्याच्या वारंवार दर्शनाने या परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.