लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील राष्ट्रीय हरित लवादातील (एनजीटी) दाव्यांच्या सुनावणीला काही प्रमाणात का होईना गती मिळणार आहे. नियुक्त्या रखडल्यामुळे साडेतीन वर्षे सुनावणी बंद होती. आता ए. सत्यनारायण यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, सोमवार (दि.२) पासून ऑनलाईन सुनावणीला सुरुवात होणार आहे. पुण्यातील एनजीटीकडे प्रलंबित दाव्यांची संख्या ६५० इतकी असल्याचे सांगण्यात आली आहे.
पर्यावरणीय दावे त्वरित निकाली लागून त्याद्वारे निसर्गाचे संवर्धन व्हावे, यासाठी देशातील सर्वच एनजीटीमध्ये न्यायाधीश, अध्यक्ष आणि तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती व्हावी, अशी याचिका येथील एनजीटी बार असोसिएशनतर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिकेवर तीन वर्षे सुनावणी झाल्यानंतर देशातील सर्व एनजीटीमध्ये एप्रिलमध्ये चार न्यायाधीश आणि तीन तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायाधीश व तज्ज्ञांच्या नियुक्तीबाबत कालमर्यादा निश्चित केली होती. परंतु त्याचे पालन झाले नाही.
सद्यस्थितीत न्यायालयीन कामकाजाच्या दिवशी येथील दाव्यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे दिल्लीत सुनावणी सुरू आहे. त्यासाठी दिवसातील केवळ १०.३० ते ११ असा अर्ध्या तासाचा वेळ देण्यात येत आहे. या वेळेत केवळ तत्काळ व महत्त्वाच्या दाव्यांवरच सुनावणी होत आहे.
-----------------------------
पुण्यातले खंडपीठ २०१३ साली स्थापन झाले होते. या खंडपीठाचे कामकाज २०१७ पर्यंत सुरळीत चालले. मात्र, १ फेब्रुवारी २०१८ पासून नियुक्त्या रखडल्या होत्या. एनजीटी बार असोसिएशनतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत वेळोवेळी आदेश दिले. त्यानुसार पर्यावरण मंत्रालयाने काम हाती घेतल्यावर नियुक्त्या झाल्या आहेत. परंतु, तज्ज्ञ सदस्याची जागा रिक्त आहे. त्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. सध्या न्यायाधीश पुण्यात आले असले तरी तज्ज्ञ सदस्य हे भोपाळला आहेत. हे असे दावे ऑनलाईन चालणार आहेत. जर समितीमधील तज्ज्ञ पुण्यात आले तर पुण्यातले खंडपीठ ऑनलाईन किंवा कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर प्रत्यक्ष चालू होऊ शकेल.
- अॅड. सौरभ कुलकर्णी, अध्यक्ष, एनजीटी बार असोसिएशन
---------------