पुणे : राज्य शासनाने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू केले़ परंतु, प्रारंभीपासूनच आॅनलाईन नोंदणीचे बंधन व नोंदणी सुरू होताच बुक होणारे स्लॉट यामुळे त्रस्त झालेल्या या वयोगटातील लसीकरण कसेबसे १३ दिवस लसीकरण झाले़ मात्र लसअभावी १४ मेपासून या वयोगटातील लसीकरण पूर्णपणे ठप्प झाले असून, या सर्वांना लस उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करण्याशिवाय महापालिकेकडेही कुठलाच पर्याय उरलेला नाही़
महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू झाले़ याकरिता आॅनलाइन बुकिंग आवश्यक होती़ याकरिता युवा वर्ग हाती मोबाइल घेऊन ही नोंदणी करू लागला़ नोंदणी करण्यासाठी महापालिकेने निश्चित करून दिलेली वेळ व नोंदणी करेपर्यंत दुस-या दिवशीचे लसीकरण स्लॉट फुल्ल हा अनुभव हजारो युवकांनी घेतला़ याला कारण कोविन पोर्टलवरील ट्रॅफिक (एकाच वेळी लाखो जणांकडून होणारी नोंदणी) हे ठरले़
परंतु, १८ ते ४४ वर्गासाठी पुरविण्यात आलेला लसीचा तुटपुंजा पुरवठा व या वयोगटातील लाखोंची संख्या यांचा कुठेच आजपर्यंत ताळमेळ बसला नाही़ त्यातच राज्य शासनाकडून १४ मेपासून आजपर्यंत या वयोगटाला लसी दिल्याच गेल्या नाही़ परिणामी गेल्या आठ दिवसांपासून या वयोगटातील शहरातील लसीकरण पूर्णत: बंद आहे़
--------------------
चौकट १
शहरात १८ ते ४४ वयोगटातील १८ हजार ५०८ जणांना लसीकरण करण्यात आले आहे़ यामध्ये ८ हजार ८९७ जणांना कोविशिल्ड या लसीचे तर, ९ हजार ५१४ जणांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे़
पुणे शहरात साधारणत: या वयोगटातील २५ लाख लोकसंख्या असून, यापैकी केवळ ०़७ टक्के लोकसंख्येला लसीकरण झाले़ दरम्यान फ्रंटलाईन वर्कर, आरोग्यसेवक यांमधील १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाची संख्या साधारणत: शहरात २० हजाराच्या आसपास आहे़ यापैकी अनेकांचे दोन डोसही पूर्ण झाले आहेत़
-------------
चौकट २
राज्य शासनाच्या आदेशानुसार १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना १ मे पासून लसीकरण करण्यात आले़ शासनाकडून उपलब्ध लसीप्रमाणे या वयोगटातील लसीकरण शहरातील ५ केंद्रांमार्फत करण्यात आले़ १४ मेपासून नवीन आदेश आल्याने हे लसीकरण पूर्णत: बंद आहे़ मात्र शासनाकडून या वयोगटातील लसीकरण सुरू करण्याबाबतचे आदेश आल्यावर व मुबलक लस प्राप्त झाल्यास शहरातील प्रत्येक प्रभागात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे़
- डॉ़ आशिष भारती
आरोग्य प्रमुख पुणे महापालिका़
--------------
आॅनलाईन नोंदणीच होत नाही
१ मे पासून आॅनलाईन नोंदणीसाठी महापालिकेने ठरवून दिलेल्या वेळेत बुकिंग करण्याचा प्रयत्न केला़ कोविन पोर्टलवर नाव नोंदणी करून ओटीपी येईपर्यंत दुसºया दिवशीचे लसीकरण फुल्ल दाखवत होते़ असे अनेकदा झाले़ त्यातच आता १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण पूर्णपणे बंद असल्याने पुढील आदेशाची वाट पाहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही़
शुभम कुदळे, एक युवक