पुणे : शिवाजीमहाराजांचा पराक्रम जितका महत्त्वाचा, तितकाच त्यांचे शौर्य पोवाडारूपी काव्यातून प्रेरणा देणारा कवीही तितकाच महत्त्वाचा आहे. पोवाड्याच्या माध्यमातून तरुणांच्या रोमारोमांत चैतन्य निर्माण करण्याची ताकद कवितेत असते. कवी हा समाजाला दिशा देण्याचे काम करत असतो, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. श्री साई प्रतिष्ठानतर्फे रंगत-संगत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर यांना श्री साई काव्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी मोरे बोलत होते. या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे, ज्येष्ठ कवयित्री प्रतिभा शाहू मोडक आणि जया नेरे, श्री साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय चौधरी उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समितीचे अध्यक्ष दिलीप सवणे, जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मेमाणे, ह्यूमन राईट्सच्या अध्यक्षा हिना शेख आणि समिधा संस्थेचे अध्यक्ष व्यंकटसाई चलसानी उपस्थित होते. मोरे म्हणाले, ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून स्वातंत्र्यलढ्यापर्यंत कवींनी तरुणांच्या मनात चैतन्य जागवले. बरेचदा कवींना समाजात दुय्यम स्थान मिळते. कवीच्या लेखनाने काय फरक पडतो, असा प्रश्न व्यावहारिक जगात वावरणाऱ्यांकडून केला जातो. परंतु, कवी इतिहास घडवू शकतो.’फ. मुं. शिंदे म्हणाले, ‘कवींची निरीक्षणशक्ती मोठी असते. कवी हा चरित्रात्मक समीक्षकच असतो. नवकवींनी कोणाचेही अनुकरण न करता आपले व्यक्तिमत्त्व कवितेतून कसे प्रतिबिंबित होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. समाजात वावरताना दु:खाचे आविष्कार सभोवताली असतातच; परंतु, ते आविष्कार प्रत्येकालाच मांडता येतील असे नाही.’ संजय चौधरी यांनी प्रास्ताविक केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
कवी समाजाला दिशा दाखवण्याचे काम करतात. मी स्वत: कवी नसलो तरी संस्थेच्या माध्यमातून कवींना व्यासपीठ मिळवून देण्याची संधी मला मिळाली आहे. या पुरस्कारामुळे काम करण्याची उमेद अनेक पटींनी वाढली आहे.- अॅड. प्रमोद आडकर