पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत मतदार जागृती अभियानासाठी नृत्यांगना मृण्मयी गोंधळेकर हिची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. कोणताही आर्थिक मोबदला न घेता मृण्मयी मतदान जनजागृती करणार आहे. मी मतदान करणार असून, तुम्हीही मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजवा, असे आवाहन तिने केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ रोजी होणार असून, मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागाने मतदार जागृती अभियान राबविण्याचे ठरविले आहे. तरुणांच्या अधिकाधिक मतदान नोंदणीवर भर दिला जाणार आहे. तरुणांची टक्केवारी वाढावी, यासाठी शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये मतदारनोंदणी अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारी २०१७ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांना पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. महापालिका निवडणुकीत मतदान करण्यासाठी सप्टेंबर आणि आॅक्टोबर या महिन्यात नोंदणी करणे आवश्यक आहे. विधानसभेसाठी तयार करण्यात आलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी महापालिकेच्या निवडणुकीसाठी वापरली जाते. निवडणूक आयोगाने १५ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या कालावधीत विधानसभा मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. नृत्याच्या विविध स्पर्धांमधून यश मिळविणारी आणि सध्या विविध चित्रपटांतून झळकणारी पिंपरी-चिंचवडची नृत्यांगना मृण्मयी गोंधळेकर या वर्षी मतदार जागृतीचे काम करणार आहे. सामाजिक जाणीव ठेवून यासाठी तिने कोणतेही मानधन घेतलेले नाही. दवंडीही पिटणार मतदारनोंदणी अभियानाविषयी प्रत्येक प्रभागात विशेष कक्ष सुरू करण्यात येणार आहे. जनजागृती वाढावी, या उद्देशाने प्रभागा-प्रभागांत दवंडी पिटली जाणार आहे. तसेच, चित्ररथ फिरवून ध्वनिक्षेपकाद्वारे अभियानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली जाणार आहे. लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचाही अभियानात सहभाग वाढविण्यात येणार आहे. पीएमपी बसमध्ये ध्वनिफितीद्वारे प्रचार केला जाणार आहे.चित्रपटगृह, रेडिओ, सोशल मीडियामार्फतही जनजागृती करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे, असे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या विषयी मृण्मयी गोंधळेकर म्हणाली, ‘‘देशातील प्रत्येक नागरिकाचे मत हे अमूल्य असून, प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवायला हवा. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे मतदारनोंदणी अभियानात तरुणांनीही सहभाग घ्यायला हवा. महापालिका निवडणुकीतील मतदानासाठी मीही नावनोंदणी केली आहे.’’ (प्रतिनिधी)आर्चीच्या आवाजात मतदार जागृतीसैराटमधून एका रात्रीत स्टार झालेल्या आर्ची अर्थात रिंकू राजगुरू मतदार नोंदणी अभियानात सहभागी होणार आहे. ‘मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू’ असे सांगून मतदारजागृती करणार आहे. तिच्या आवाजाची ध्वनिफीत ऐकविली जाणार आहे. निवडणुका आल्या, की निवडणूक प्रशासनासमोर मतदारांचे यादीत नावनोंदणी करणे, मतदार ओळखपत्र तयार करून घेणे, तसेच त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे मोठे आव्हान असते. त्यामुळेच हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अठरा महाविद्यालये, मुख्य चौक, गल्लोगल्ली ऐकायला मिळणार आहे. मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आर्चीच्या आवाजाच्या लकबीची साडेचार मिनिटांची ध्वनिफीत रेकॉर्ड केली आहे. यासाठी शुभांगी शिंदे यांनी लेखन करून आवाज दिला आहे.
मृण्यमी गोंधळेकर करणार मतदानासाठी जागृती
By admin | Published: September 15, 2016 1:31 AM