लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत पुणे जिल्ह्याला सर्वोत्कृष्ट कामासाठी पुरस्कार जाहीर केला आहे. दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते यानिमित्त जिल्ह्याचा गौरव होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हा पुरस्कार स्वीकारतील.
या योजनेतील जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या ५ लाख ३० हजार २३५ आहे. या सर्वांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत ५०० कोटी ५४ लाख १४ हजार रुपये जमा करण्यात आले. सन २०१९ पासून ही योजना जिल्ह्यात राबवण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या वतीने लाभार्थ्यांची तपासणीही करण्यात येते. त्यासाठी केंद्राने जिल्ह्यातील २० हजार १३ लाभार्थ्यांची नावे पाठवली होती. जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष त्यांच्या ठिकाणी जाऊन, त्यांच्याबरोबर बोलून ही तपासणी केली. तपासणीचे काम १०० टक्के पूर्ण केल्याबद्दलही जिल्ह्याचा गौरव होणार आहे.
योजनेतील १ लाख ७९ हजार लाभार्थ्यांचे आधार कार्ड प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. ४८ हजार २९५ लाभार्थ्यांच्या बँक खात्याचा तपशील चुकीचा होता. तो बरोबर केला. १ हजार २३५ जणांनी तक्रारी केल्या होत्या, त्यांचेही १०० टक्के निराकरण प्रशासनाकडून करण्यात आले.
याशिवाय खात्यात पैसे जमा झाले, पण आयकर जमा करणे व अन्य काही कारणांमुळे काही लाभार्थी अपात्र ठरले. त्यांच्याकडून प्रशासनाने ५ कोटी ८० लाख ५८ हजार रुपयांची वसुलीही केली.
कोरोनाचे संकट असतानाच्या काळातच योजनेचे काम सुरू ठेवले होते. तालुकास्तरावरील उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक ठरवून दिलेले काम करत होते, त्यामुळे उद्दिष्टपूर्ती झाली. या योजनेला २ वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात पुणे जिल्ह्याचा खास गौरव होणार आहे.