चिंचवड : जीवनात मिळणारा कोणताही पुरस्कार लहान किंवा मोठा नसतो. सर्व पुरस्कार सारखेच. पुरस्कार हे कलाकाराला विशिष्ट उंचीपर्यंत नेतात. प्रेरणा देतात. त्यामुळे प्रत्येक पुरस्कार महत्त्वाचा, पे्ररणादायी असतो. कलावंतांच्या आयुष्यात वेगळी छाप पाडतो, असे मत प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज यांनी आज येथे व्यक्त केले. संभाजीनगर, चिंचवड येथील साई उद्यानात पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित स्वरसागर संगीत महोत्सवात ते बोलत होते. पंडितजींना स्वरसागर संगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. पन्नास हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर शकुंतला धराडे, प्रख्यात गायक महेश काळे, आयुक्त दिनेश वाघमारे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, माजी महापौर योगेश बहल, नारायण बहिरवाडे, प्रसाद शेट्टी, प्रसिद्ध नर्तक नंदकिशोर कपोते, सुरेखा कुलकर्णी आदी उपस्थित होते. पंडित पद्माकर कुलकर्णी स्मृतिगौरव पुरस्कार पुरस्कार रावेत येथील अश्विनी केदार तळेगावकर यांना प्रदान केला. पंडित जसराज म्हणाले, ‘‘दहा वर्षांपूर्वी मी हाच पुरस्कार गायिका प्रभा अत्रे यांना दिला होता. दहा वर्षांनंतर तो मला मिळतोय. नक्कीच आनंद वाटतो. महापालिकेचा हा संगीतविषयक उपक्रम चांगला आहे.’’ प्रवीण तुपे प्रास्ताविक म्हणाले, ‘‘महापालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंतांचा कलाविष्कार शहरवासीयांना अनुभवण्यास मिळावा आणिस्थानिक कलावंतांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने स्वरसागर महोत्सव सुरू केला आहे. शहरातील सांस्कृतिक चळवळीत भर टाकणारा हा उत्सव आहे. ’’ मंगला कदम यांनी स्वागत केले.(वार्ताहर)
पुरस्कार प्रेरणादायी!
By admin | Published: December 22, 2016 1:57 AM