पुणे: प्रत्येक कवीला चाल ही सुचतेच, ठेका नसेल तर लिहायला जड जाते, त्यामुळे कवी हा संगीतकार असतो आणि संगीतकार हा कवी असतो. आज पुरस्काराच्या माध्यमातून आमच्या लेखनाला मान देऊन प्रोत्साहित केल्यामुळे यापुढं आम्ही लिहीत राहणार, असा विश्वास देत प्रसिद्ध संगीतकार अजय यांनी ' नटरंग' मधील 'तोडुनिया टाकलिया नाळ, कपाळी लिव्हल नाही' या स्वलिखित गीताचे बोल सादर करून रसिकांची मने जिंकली. स्व.प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्रमंडळच्यावतीने यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा टिळक स्मारक मंदिर येथे पार पडला. याप्रसंगी डॉ. डी.वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ पी.डी पाटील, अभिनेते मकरंद अनासपुरे, रामदास फुटाणे, सचिन ईटकर, संजय ढेरे, विजय ढेरे उपस्थित होते. यावेळी गायक आणि संगीतकार अजय-अतुल यांना पी.डी पाटील आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते कै. प्रकाश ढेरे स्मृतीप्रित्यर्थ जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 25 हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय रावसाहेब कुवर (साक्री), अनुजा जोशी( गोवा) आणि पी. विठ्ठल यांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार देण्यात आला. 11 हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे. आजवर संगीतकार, गायक म्हणून खूप पुरस्कार घेतले पण कवी म्हणून आमच्यासाठी हा पुरस्कार मानाचा आहे अशी भावना अतुल यांनी व्यक्त केली. गीतकार आणि कवी वेगळे करू नका याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
कवी म्हणून आमच्यासाठी हा पुरस्कार मानाचा : अजय-अतुल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 10:56 PM