इंडिया रिव्हर फोरममार्फत २०१४ पासून, स्व. रामास्वामी अय्यर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापलेल्या निवड समितीमार्फत ‘भगीरथ प्रयास सन्मान’ दिला जातो. नदी संवर्धनासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थाना प्रोत्साहन दिले जाते. २०१४ पासून अशा संस्थांना देऊन गौरविले जाते. नदी संवर्धन व पुनरुज्जीवन क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना एकत्र आणण्यासाठी इंडिया रिव्हर फोरमची स्थापना करण्यात आली.
जीवितनदीच्या संस्थापक-संचालक, शैलजा देशंपाडे, हा सन्मान स्वीकारताना म्हणाल्या की, “या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी जीवितनदीची निवड केल्याबद्दल, आभारी आहे. हा सन्मान आम्ही, पुण्यातल्या नद्यांवर हिरहिरीने काम करणाऱ्या आमच्या सर्व सदस्यांना, तसेच आमचे गुरू, स्व. प्रकाश गोळे, डॉ. राजगुरू, डॉ. प्रमोद मोघे, डॉ. स्वाती गोळे आणि इतर सर्व मार्गदर्शकांना अर्पण करतो. आमच्याशी संलग्न सर्व संस्था तसेच भारतातल्या वेगवेगळ्या भागात नद्यांच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या सर्व नदी योद्ध्यांना हा सन्मान सादर अर्पण.” पुण्याच्या नद्यांच्या रक्षणासाठी लढणारे आर्किटेक्ट सारंग यादवाडकर यांनाही या सन्मान मिळाला. ‘अनुपम मिश्रा मेमोरियल मेडल २०२०’ या पुरस्काराने पत्रकार मकरंद पुरोहित यांना गौरविण्यात आले.