पुणे : म्हातोबा टेकडीवर शुक्रवारी वणवा पेटला होता. परंतु, तेथून जाणाऱ्या काही नागरिकांनी तो विझवण्याचा प्रयत्न केला आणि वन संपत्ती वाचविली. झाडाच्या फांदीने पसरणारी आग विझवली. त्यामुळे हे नागरिक खऱ्या अर्थाने जागरूक ठरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून टेकडीवर, वन क्षेत्रात वणवा लागत आहे. त्यामध्ये गवत आणि वन्यजीवांचे प्राण जात आहेत. छोटे कीटक ज्यांना पळता येत नाही, त्यांना आपला जीव या आगीत गमवावा लागत आहे. म्हातोबा टेकडीवर शुक्रवारी बरीच मोठी आग लागली होती. ती आग लागली की, लावली याबाबत शंका आहे. तेथील गवत वाळलेले असल्याने आगीने मोठा पेट घेतला. पण तेथून जाणाऱ्या काही नागरिकांनी प्रसंगावधान साधून झाडाच्या फांदीने आणि काही ठिकाणी आगच्या पुढील पालापाचोळा बाजूला केल्याने तेथून पुढे आग पसरली नाही.
मंगेश आवटी म्हणाले,‘‘टेकडीवर फिरताना वणवा पाहिला आणि आम्ही तो विझविण्याचा प्रयत्न केला. त्यासोबत तिथे काही वन विभागाचे मजूर होते. त्यांनी देखील येऊन मदत केली. त्यामुळे आग आटोक्यात आणली.’’