पुणे : जागतिक व्यंगचित्रकार दिन ५ मे रोजी साजरा केला जातो. यानिमित्त देशातील नामवंत व्यंगचित्रकार आपापल्या व्यंगचित्रशैलीतून 'कोरोनाविषयी जनजागृती’ करणार आहेत. ‘कार्टून्स कट्टा’ व्यंगचित्रकार ग्रुपच्या वतीने ४ मे ते ६ मेदरम्यान सोशल मिडियावर हे अभियान राबविले जाणार आहे.
व्यंगचित्रकार दिनानिमित्त दरवर्षी ‘कार्टून्स कट्टा’ महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुप पुण्यात व इतर शहरात व्यंगचित्रांचे प्रदर्शन व कार्यशाळा घेत असते. या उपक्रमाद्वारे व्यंगचित्रांचा प्रसार व प्रचार व्हावा हा मुख्य उद्देश असतो. कोरोना महामारीच्या विळख्यामुळे यावर्षी ५ मे रोजी कुठल्याही कलादालनात व्यंगचित्राचे प्रदर्शन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे ''कार्टुन कट्टा'' तर्फे देशभरातील निवडक व्यंगचित्रकार आपापल्या व्यंगचित्रशैलीतून कोरोना या विषयावर व्यंगचित्रे रेखाटून जनजागृती करणार आहोत, असे व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख यांनी कळविले आहे.
व्यंगचित्रकारांची सर्व व्यंगचित्रे ईबुक, ऑनलाइन व्यंगचित्र प्रदर्शन व स्लाइड शो माध्यमातून सोशल मिडियावर ४ ते ६ मे दरम्यान प्रत्येक राज्यातून प्रसारित केली जाणार आहेत. ‘आमचा लढा कोरोनाशी’ हे व्यंगचित्र प्रदर्शन https://www.facebook.com/groups/384435731999922/?ref=share या लिंकवर पाहता येईल.