पुणे : पुण्यातील सध्याचा सर्वात जटील प्रश्न म्हणजे वाहतूकीची समस्या. राेज पुण्यात हजार ते दीड हजार नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. राेज सकाळ संध्याकाळ रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यातच वाहतूकीचे नियम न पाळल्यामुळे अनेक अपघात हाेत असल्याचे सुद्धा चित्र आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी पुण्यातील कला प्रसारणी सभा आणि वाहतूक शाखेतर्फे अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन रवी वर्मा आर्ट गॅलरी भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये एकूण 420 चित्रे मांडण्यात आली आहेत. या चित्रांच्या माध्यमातून वाहतूकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. यात हेल्मेट न घातल्यामुळे हाेणारे नुकसान, दारु पिऊन गाडी चालविल्याने निर्माण हाेणारे धाेके त्याचबराेबर इतर नियम माेडल्याने हाेणारे नुकसान चित्रांच्या माध्यमातून दाखविण्यात आले आहे. 'शामच नसेल तर शामची आई काय करणार?' असे कॅप्शन लिहून काढण्यात आलेले चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचबराेबर 'ते निघून गेले ज्यांना घाई हाेती' हे वाक्य असलेल्या चित्रातून देखील वाहने सावकाश चालविण्याचा संदेश देण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पाेलीस आयुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते झाले, यावेळी वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते उपस्थित हाेत्या.