लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आजकाल पर्यावरणपूरक, शाश्वत गोष्टींच्या वापराबद्दल सातत्याने सांगितले जाते. मात्र, पर्यावरणपूरक वस्तू कोठे उपलब्ध होतील, हे सांगितले जात नाही. यावर उपाय म्हणून गिरीजा ओक-गोडबोले यांच्या पुढाकारातून दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ‘इको फ्रेंडली विकेंड’ ही संकल्पना राबवली जाणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरील शिरोळे पथ इथल्या टेलिफोन शॉपीसमोरील ‘आयाम हाऊस ऑफ आद्या’ यांच्या कार्यालयामध्ये हे प्रदर्शन पार पडणार आहे.
या महिन्यातील प्रदर्शन १९ ते २१ मार्च आयोजित करण्यात आले आहे. या माध्यमातून पर्यावरणपूरक वस्तुंचे उत्पादन करणाऱ्या किंवा त्यांच्या सेवा देणाऱ्या संस्थांना आणि खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींना एकाच छताखाली आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
प्रदर्शनात नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या वाट्या, बांबुपासून बनवलेले पेन, पेपर बॅग्ज, ऑरगॅनिक कापूस, हातमागावर विणले जाणारे कापड, छोटया पॅकिंगमधील कॉस्मेटिक्स, काचेच्या बाटल्यांमध्ये मिळणारा शांपू, फरशी पुसायचं क्लिनर, कापडी पिशवीत ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेले धान्य अशी उत्पादने उपलब्ध होणार आहेत.
घरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन अगदी छोट्या पातळीवर कंपोस्ट खत आणि बायोगॅसचे सेट तयार करुन देणारी टीम या प्रदर्शनात असणार आहे. घराच्या बाल्कनीत भाज्या पिकवण्याचे मार्गदर्शन मिळणार आहे. पर्यावरणच्या संरक्षणासाठी अगदी छोट्या छोट्या सवयींमध्ये काय बदल करावे आणि त्याऐवजी कोणत्या गोष्टी कराव्यात याबद्दल सल्ला आणि मार्गदर्शन देखील मिळणार आहे.