प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : आगामी अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलन संत गोरा कुंभार यांच्या पावन भूमीत अर्थात उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारीदरम्यान होत आहे. संमेलनाच्या बोधचिन्हावर संत गोरा कुंभार रचित अभंगातील ‘म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे, जग हे करणे शहाणे बापा’ या पंक्ती चितारण्यात आल्या आहेत. संमेलनाची स्मरणिका, परिसंवाद आदी माध्यमातून संतपरंपरेचा जागर होणार आहे.मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेला यंदाच्या साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या उस्मानाबादच्या भूमीत संमेलन होत आहे. संत साहित्याचे अभ्यासक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवत आहेत. यंदाचे संमेलन संतपरंपरा, संतवाङ्मयाला समर्पित करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. स्मरणिकेतील विषय, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आदींच्या माध्यमातून मराठवाड्यातील संत परंपरा अधोरेखित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.मराठवाड्याला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. साडेआठशे वर्षांच्या कालखंडाचा विचार केल्यास तुकाराम महाराजांच्या उदयापर्यंत पहिल्या चारशे वर्षांचे वाङ्मय लेखन मराठवाड्यातील संतांनीच केले आहे. तुकाराममहाराज उदयाला आल्यानंतर उर्वरित महाराष्ट्रातून लेखन सुरू केले. मराठी वाङ्मयाचा पहिल्या चारशे वर्षांचा इतिहास मराठवाड्यातील संतांनी समृद्ध केला आहे. संत नामदेव, ज्ञानेश्वर, जनाबाई, मुक्ताई अशा अनेक संतांनी परंपरेचा वारसा पुढे नेला. त्यामुळे वारशाचे जतन, संवर्धन व्हावे, यासाठी उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनात प्रयत्न होणार आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. .....मराठवाड्याला संत साहित्याची मोठी परंपरा लाभली आहे. संत गोरा कुंभारांच्या भूमीमध्ये यंदाचे साहित्य संमेलन होणार आहे. त्यामुळेच संतपरंपरा हे यंदाच्या संमेलनाचे आकर्षण असणार आहे. संतसाहित्याशी संबंधित विषयांचा परिसंवादामध्ये समावेश असेल. संमेलनाच्या स्मरणिकेमध्येही संतसाहित्याशी संबंधित लेखांचा समावेश असणार आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.- नितीन तावडे, स्वागताध्यक्ष.......स्मरणिकेची जबाबदारी साहित्य महामंडळाकडे असते, असा सर्वसाधारण समज आहे. संमेलनाच्या निमित्ताने स्वागत मंडळाने केलेले काम, संमेलनातील मुख्य विषय, त्यांची निवड आदी विषयांचा समावेश स्मरणिकेमध्ये असतो. संपादक मंडळही स्वागताध्यक्षांनी नेमलेले असते. संपादक मंडळ लेखकांविषयी महामंडळाशी चर्चा करते. मात्र, महामंडळाच्या सूचनांचे पालन करण्याचे बंधन त्यांच्यावर नाही. महाबळेश्वर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उभ्या राहिलेल्या विविध भूमिकांचे निराकरण करण्यासाठी मी याविषयी लिहिले होते. .........डॉ. श्रीपाद जोशी यांनी महामंडळाची एक व्यक्ती संपादक मंडळात समाविष्ट करण्याचा पायंडा पाडला होता, पण तो पायंडा कायम ठेवणे औचित्याला धरुन नाही. महामंडळाचा सदस्य असेल तर स्वागत मंडळावर बंधने येतात. सर्व कामांचे श्रेय महामंडळाने घ्यायचे आणि स्वागत मंडळाने केवळ सतरंज्याच उचलायच्या का? म्हणूनच स्वागत मंडळाला स्मरणिकेबाबत पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे ठाले पाटील म्हणाले.........उस्मानाबादमधील मराठी साहित्य संमेलनामध्ये विविध कार्यक्रमांमधून संतपरंपरेच्या आजच्या काळाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘संतवाङ्मय आणि आजचा काळ’ अशा आशयाचा परिसंवादही आयोजित करण्यात येईल. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद अशा प्रत्येक विभागातून एक, बृहन्महाराष्ट्र आणि उस्मानाबादमधून एक अशा संतसाहित्याच्या अभ्यासकांचा परिसंवादात सहभाग असेल. - कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ......
उस्मानाबाद साहित्य संमेलनातून संतपरंपरेचा जागर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 6:33 PM
मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेला यंदाच्या साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे.
ठळक मुद्दे१० ते १२ जानेवारीदरम्यान रंगणारसंमेलनाची स्मरणिका आणि परिसंवादातही संत गोरोबा यांच्या साहित्यावर चर्चा