दौंड: राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. मात्र, अजूनही लोकांमध्ये लसीबाबत भीती आहे. त्या अनुषंगाने हडपसर (पुणे) येथील १४ डॉक्टरांच्या ग्रुपने हडपसर-पंढरपूर असा सायकलने प्रवास करून लसीकरण मोहिमेची जनजागृती केली. एवढेच नाही तर काही गावांमध्ये बैठका घेऊन त्याचबरोबर माहितीपत्रकेही त्यांनी वाटली.
हडपसर येथे रनोहोलिक्स नावाचा सायकलस्वारांचा ग्रुप आहे. यामध्ये सर्वच लोक डॉक्टरी पेशाचे आहेत. काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. परंतु, नागरिकांमध्ये लसीबाबत अद्यापही भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून जपत रनोहोलिक्स क्लबच्या सदस्यांनी हडपसर ते पंढरपूर असा प्रवास करत लसीकरणाची जनजागृती करण्याचे नियोजन केले. या मोहिमेत डॉ. योगेश सातव, रश्मी सातव, शंतनू जगदाळे, विनोद बोरोले, प्रवीण जावळे, सारिका रेवडकर, निरंजन रेवडकर, पंचाक्षरी हिरेमठ, राजाराम शिंदे, सुहास लोंढे, विठ्ठल सातव, योगेश गायकवाड, प्रवीण पाटील, अर्षभ घाणेकर आदी सहभागी झाले.
हडपसर येथून पहाटे पाच वाजता या मोहिमेला सुरुवात झाली. मार्गामध्ये येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये या क्लबच्या सदस्यांनी कोरोना लसीचे नागरिकांना महत्व पटवून दिले. कोरोना काळात ही लस का उपयोगी आहे, त्याचा परिणाम काय असतो किंवा ही घेणे गरजेची का आहे याची माहिती दिली. काही गावांमध्ये तर त्यांनी बैठका घेऊन ग्रामस्थांच्या मनातील शंकांचे निसरण केले. याशिवाय संपूर्ण प्रवासात माहिती पत्रकांचे वाटपही केले. त्यानंतर दुपारी पंढरपूर येथील श्रीसंत नामदेव पायरी तसेच विठ्ठल मंदिराच्या परिसरातही लसीकरणाचे महत्त्व या बाबत प्रबोधनात्मक पत्रके वाटली.
दरम्यान, पाटस येथे रनोहोलिक्स ग्रुपच्या सदस्यांचा दौंड सायकलिंग क्लबचे अध्यक्ष डाॅ. राजेश दाते आणि पाटस ग्रामविकास फाउंडेशनचे हर्षद बंदिष्टी यांनी सत्कार केला. याप्रसंगी दादासाहेब जाधव, साखर सोनटक्के, जुनेदभाई तांबोळी, राजू गोसावी, मनोहर बोडखे उपस्थित होते.
कोट..
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच लोकांनी लसीकरण करणे आवश्यक आहे. शहरातील लोक लस घेण्यासाठी स्वत:हुन पुढे येऊ लागले आहे. मात्र, ग्रामीण भागात त्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आम्ही लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्याचे ठरवले. पूर्वीपासूनच आम्ही सायकलिंग करत होतो. त्यामुळे सायकलिंग करूनच लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला.
डॉ. याेगेश सातव
०४ दौंड
हडपसर येथील रनोहोलिक्स ग्रुपचे सायकलपटू लसीकरणाचे प्रबोधन करताना.