बारामती : असं म्हणतात की, कलाकाराला वेळ,काळ, वय आणि स्थळांचं भान नसतो. तो कलेच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो. त्याच्या कलेच्या प्रवाहाला कितीही मोठं संकट रोखू शकत नाही. असंच काहीसं बारामतीच्या एका अवलिया युवा कलाकाराबद्दल म्हणावे लागेल. त्याने आपल्या कुंचल्यातून एकाहून एक सरस चित्रं रेखाटली आहे. आणि त्याच्या लयभारी चित्रांना बारामतीकरांची वाहवा मिळत आहे.
दीपक रणपिसे असे या युवा अवलिया कलाकाराचं नाव आहे. तो मुंबई येथे कला विद्या संकुलात रेखा व रंगकला या विषयाच्या तिसऱ्या वर्षांत शिकत आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे शिक्षण बंद असल्याने तो घरीच आहे. बारामती शहरातील भिगवण चौकात आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. या आवारातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह बारामती शहरातील विविध ठिकाणे, प्रसिद्ध व्यक्ती आणि मंदिरांसह बरीच चित्रे रेखाटली आहेत. या युवा कलाकाराने कुंचल्यातून रेखाटलेली चित्रं बारामती कौतुकाचा विषय ठरली आहे.
आरोग्य विभागात काम करत असलेल्या तरुण मित्रांनी त्याला चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देत त्यासाठी लागणारे रंग व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी मदत केली आहे. या चित्रांमुळे परिसराचा कायापालट झाला आहे. दीपक रणपिसे या कालाकाराने हुबेहूब चित्र रेखाटली आहेत. येथे येणाऱ्या लोकांना या चित्रातून शहरातील जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, असे आरोग्य विभागप्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले.
दरम्यान, चंदन लालबिगे, अक्षय बिवाल, रणधीर लोहाट, राहुल जेधे, कुणाल विवाल, मनीष लालबिगे, अशोक कांबळे, रितेश जाधव, अक्षय लांडगे, रवी वाडिया यांनी दीपक यास सहकार्य केले.