पुणे : पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमने ६ दिवसांत ५ यकृत व १ मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण करून नुकतीच अभूतपूर्व कामगिरी केली. सह्याद्रीतील डॉक्टरांच्या तज्ज्ञ टीमने नुकतेच ६ दिवसांत विल्सन डिसीझ, क्रिप्टोजेनिक, यकृत व मूत्रपिंड निकामी झालेल्या व लिव्हर सिरोसिसने ग्रस्त असलेल्या ५ रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. प्रत्येक शस्त्रक्रिया संपूर्ण यशस्वी व्हावी, याची निश्चिती करण्यासाठी समर्पित शल्य चिकित्सक, एनस्थेटीस्ट, तंत्रज्ञ व प्रत्यारोपण संयोजक या सर्वांनी एकमेकांशी पूर्ण ताळमेळ साधून अथक काम केले. सह्याद्री हॉस्पिटल्सच्या यकृत प्रत्यारोपण टीमने विल्सन डीसीजने ग्रस्त असलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर २० सप्टेंबर रोजी पहिली शस्त्रक्रिया केली. एका कॅडॅव्हर दात्या कडून यकृत प्राप्त झाल्यानंतर यकृत प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया ८ तास चालली. दुसरी शस्त्रक्रिया २१ सप्टेंबरला झाली. यात यकृत आणि मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे ६१ वर्षीय रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि एकाच शस्त्रक्रियेत यकृत व मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले. प्रत्यारोपण टीमने २२ सप्टेंबरला आपली तिसरी शस्त्रक्रिया सुरु केली. यात यकृत सिरोसिसने ग्रस्त असलेल्या ४२ वर्षीय रुग्णाला जिवंत दात्याकडून अवयव मिळाले आणि ही शस्त्रक्रिया २२ तासांमध्ये पूर्ण झाली. चौथ्या ६५ वर्षीय पुरुष रुग्णावर शस्त्रक्रिया रात्री उशीरा सुरु झाली आणि पोर्टल व्हीन थ्रोम्बोसिसची गुंतागुंत असूनही सह्याद्रीची टीम या आॅपरेशनमध्ये यशस्वी ठरली. या रुग्णाला लिव्हर सिरोरिसचा त्रास होता. शेवटच्या शस्त्रक्रियेला तब्बल २२ तास लागले. यात २५ सप्टेंबर रोजी ३५ वर्षीय पुरुषावर यकृत प्रत्यारोपणासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली.या ५ यकृत प्रत्यारोपणांपैकी २ जिवंत दात्यांचे यकृत प्रत्यारोपण होते, तर ३ कॅडाव्हेरिक दाते प्रत्यारोपण होते.सह्याद्र्री हॉस्पिटलच्या समर्पित मेडिकल टीमच्या बरोबरीने मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्या. या शस्त्रक्रियांच्या नाजूक आणि गंभीर स्वरूपामुळे त्यांच्यासाठी प्रचंड संघटनात्मक कौशल्य, अत्यंत तपशीलवार नियोजन आणि त्रुटीरहित अंमलबजावणीची आवश्यकता होती. कुठलीही जोखीम घ्यायची नाही, यासाठी बॅकअप आणि आपत्कालीन योजना तयार ठेवण्यात आल्या होत्या.