डॉ. बालाजी तांबे यांचा जन्म २८ जून १९४० रोजी झाला. त्यांनी आयुर्वेदिक औषधीशास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले. आयुर्वेदिक औषधोपचारांबाबत ते विविध माध्यमांतून प्रबोधन करत होते. नवी सुदृढ पिढी जन्माला यावी म्हणून त्यांनी ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले होते. त्यांच्या या पुस्तकाचे विविध भाषांमधून भाषांतर झाले. लोणावळ्याजवळ कार्ला येथील ‘आत्मसंतुलन व्हिलेज’मधून त्यांनी आयुर्वेदाबद्दल जनजागृती केली. त्यांनी आयुर्वेद आणि योगपोचारांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली.
लेखन
डॉ. बालाजी तांबे यांनी ‘गर्भसंस्कार’सह ‘फॅमिली डॉक्टर’,‘स्वयंपाकघरातील दवाखाना’, ‘चक्र सुदर्शन’, ‘आयुर्वेदिक घरगुती उपचार’, ‘स्वाथ्याचे २१ मंत्र’, ‘जय देवा गजानना आता व्हा प्रसन्न’, ‘श्रीमन प्रसन्न’, ‘श्री गीतायोग शोध ब्रम्हविद्येचा’, ‘मंत्र आरोग्याचा’, ‘नाते वनस्पतींशी’ अशा वैैविध्यपूर्ण पुस्तकांचे लेखन केले. ‘आत्मसंतुलन व्हिलेज’ येथून प्रकाशित होणाऱ्या ‘एको’ मासिकाचे ते संपादक होते.
पुरस्कार
तांबे यांना आयुर्वेदाच्या प्रसारासाठी रोटरी क्लब आॅफ पुणे अपटाऊन व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे २०१४ मध्ये ‘रोटरी ग्लोबल लीडरशिप एक्सलन्स’ अवॉर्ड आणि २०१७ मध्ये डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे डी.लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. ‘रेकगनिशन आॅफ एक्सलन्स इन हेल्थ केअर’साठी आयएमएचा पुरस्कार, आयुर्वेदाची जपणूक आणि विकासासाठीचा ‘प्रियदर्शनी पुरस्कार’, गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ‘सत्यशोधक समाजभूषण’ पुरस्कार, ‘संत गुलाबराव महाराज पुरस्कार’, इंडो यूएस कॉनक्लेव्हचा पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौैरवण्यात आले आहे.
--------------------
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी अध्यात्म, आयुर्वेद, योगोपचार, संगीतोपचारासारख्या पारंपरिक भारतीय उपचारपद्धतींचे पुनर्जीवन केले. आयुर्वेद, योगोपचारांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कीर्ती, लोकप्रियता मिळवून दिली. आयुर्वेदाचे महत्व घराघरांत पोहोचवले. स्वयंपाकघरातल्या वस्तूंचे आयुर्वेदिक गुण गृहिणींना समजावून सांगितले. आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, सुदृढ, आनंदी समाज निर्माण करण्याचं फार मोठे काम त्यांनी केले. बालाजी तांबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातले ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.