‘बधाई हो’मागची उलगडली केमिस्ट्री, आयुष्यमान खुराणा, नीना गुप्ता यांची ‘लोकमत’च्या ‘ती’चा गणपती मंडळाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:53 AM2018-09-26T02:53:31+5:302018-09-26T02:53:59+5:30
‘बधाई हो बधाई’मधील सर्व कलाकारांची केमिस्ट्री चांगली जुळली याचे कारण कुणामध्ये अहंकार नव्हता. संहिता सगळ्यांना माहिती होती. त्यामुळे एकमेकांबरोबर काम करताना मजा आली.
पुणे - ‘बधाई हो बधाई’मधील सर्व कलाकारांची केमिस्ट्री चांगली जुळली याचे कारण कुणामध्ये अहंकार नव्हता. संहिता सगळ्यांना माहिती होती. त्यामुळे एकमेकांबरोबर काम करताना मजा आली. हा चित्रपट म्हणजे फुल्ल टू एंटरटेन्मेंट आहे. विशेष म्हणजे आजवर मी जे चित्रपट केले त्यात मी एकतरी गाणे गायलेले आहे. या चित्रपटातही एक गाणे गायले असल्याचे आयुष्यमान खुराणा याने सांगितले.
फिनोलेक्स पाईप्स प्रस्तुत ‘आपले बाप्पा’ पॉवर्ड बाय कॅलिक्स ग्रुप आॅफ कंपनीज या उपक्रमांतर्गत ‘लोकमत’च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खत्री बंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी तसेच एच. पी. ज्वेलर्स, भोसरी येथील राणी पुतळाबाई लॉ कॉलेज हे या उपक्रमासाठी सहयोगी प्रायोजक आहेत. ‘बधाई हो’ चित्रपटाच्या निमित्ताने आयुष्यमान आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी ‘लोकमत’च्या ‘ती’चा
गणपती मंडळाला भेट देऊन आरती केली.
जंगली पिक्चर्स आणि क्रोम पिक्चर्सच्या बॅनरखालील विनीत जैन, अलिया सेन, हेमंत भंडारी आणि अमित शर्मा यांची निर्मिती असलेल्या ‘बधाई हो’ हा चित्रपट १९ आॅक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शक असून, आयुष्यमान आणि नीना गुप्ता यांच्याबरोबरच सान्या मल्होत्राही झळकत आहे. चित्रपटाचा
ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विनोदी धाटणीचा कौटुंबिक चित्रपट म्हणून प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. चित्रपटामध्ये समाजाचे प्रतिबिंब उमटते असे म्हटले जाते. आज वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट येत आहेत, ते जॉनर कसे बदलत आहेत? त्याबद्दल सांगताना नीना गुप्ता म्हणाल्या, समाज खूप बदलत चालला आहे.
सध्या रसिकांमध्ये एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे, तो म्हणजे ‘बधाई हो बधाई.’ चित्रपटाचा विषय काहीसा हटके असल्याने प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आवर्जून वाट पाहात आहेत. ‘विकी डोनर’, बरेली की बर्फी’ यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे सर्वांच्याच पसंतीस उतरलेला आयुष्यमान खुराणा पुन्हा एकदा काहीशा विनोदी जॉनरमधून प्रेक्षकांसमोर येत आहे. आयुष्यमान खुराणा, नीना गुप्ता या दोघांनी नुकतीच ‘ती’च्या गणपतीला भेट देऊन चित्रपटाविषयी मनमोकळा संवाद साधला.
गर्भवतींचा सत्कार...
‘बधाई हो’ या चित्रपटात नीना गुप्ता यांनी गर्भवतीची भूमिका केली आहे. त्यामुळे यावेळी पुण्यातील काही गर्भवतींचा त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच आयुष्यमान खुराणा व नीना गुप्ता यांनी त्या महिलांशी संवाद साधला.
‘जाने भी दो यारो’प्रमाणेच वेगळी वाट निर्माण करणारा ‘बधाई हो’
‘जाने भी दो यारो’ मधील नीना गुप्ता यांची भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहे, इतक्या वर्षांनी ’बधाई हो बधाई’मधून पुन्हा तशाच भूमिकेमधून समोर येत आहात का? असे विचारले असता नीना गुप्ता मिस्किलपणे हसल्या. मी खरेतर बोलत नाही कारण मला बोलण्याची थोडी भीती वाटते. पण हा चित्रपटही ‘जाने भी दो यारो’सारखाच वेगळी वाट निर्माण करणारा अभिजात चित्रपट होईल, याची खात्री आहे.
चित्रपटाची संहिता वाचल्यावर खूपच आवडली. ही भाूमिका करताना शारीरिकरीत्या थोडी अडचण आली, पण केवळ गर्भवती महिलेचीच ही भूमिका नाही तर या भूमिकेला खूप शेड्स आहेत. एक समाधान देणारी आणि आजवरची सर्वांत चांगली भूमिका वाटली असल्याचे त्या म्हणाल्या.
तापसी पुन्नू, परिणिता चोप्रा यांच्यासारख्या नव्या पिढीच्या काही अभिनेत्रींबरोबर मी काम केले आहे. त्यांचे काम पाहताना नवी पिढी खूप वेगळी असल्याचे जाणवले. त्या दिग्दर्शकांशी वाद घालतात, आमची त्या वेळी हिंमत नव्हती. त्यांना सगळी संहिता माहिती असते. त्या खूप हुशारपणे सगळं सांभाळतात. मेहनती आहेत.
- नीना गुप्ता
’विकी डोनर’, ‘बरेली की बर्फी’ हे चित्रपट पाहिले तर प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण पाहायला मिळाले. कोणत्याही चित्रपटाची संहिता एका प्रेक्षकाच्या नजरेतून वाचतो. प्रेक्षकांनाही काहीतरी वेगळे पाहिल्याचा सुखद अनुभव येतो. मुळातच कोणत्याही चित्रपटाची स्क्रिप्ट चांगली असायला हवी असे मी मानतो. लहानपणापासून नाटकात भूमिका करीत होतो. मग कॉलेजमध्ये असताना ‘रोडीज’ केले. त्यानंतर रेडिओमध्ये काम केले. प्रत्येक माध्यमाची चांगली ओळख झाली. एक कलाकार म्हणून वैविध्यपूर्ण भूमिका साकारायल्या मिळाल्या.
- आयुष्यमान खुराणा