बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ एका केंद्रीय मंत्री - काकासाहेब गाडगीळ यांचे ज्येष्ठ चिरंजीव होते. त्या वेळेला बॅरिस्टर होणे हा एक पैसे कमावण्याचा मार्ग होता. परंतु बरेचसे बॅरिस्टर पैसे कमावण्याच्या हेतूने, परंतु पैसे कमावण्याऐवजी राजकारणामध्ये देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये गुंतलेले आपल्याला आढळतात. सुरुवातीच्या काही काळामध्ये विठ्ठलराव बॅरिस्टर होऊन आल्यानंतर वकिली करू लागले होते. काही वेळेला ते मुंबई हायकोर्टामध्ये देखील वकिली करत होते. परंतु त्यांची वकिली जेमतेमच होती. असे असतानादेखील कायद्याचा आणि घटनांचा देश-विदेशातील घटना म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचा त्यांचा अभ्यास दांडगा होता.
विठ्ठलरावांनी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध संयुक्त महाराष्ट्रासाठी काकांच्या विरुद्ध मोर्चा काढला होता. १९५७ सालामध्ये नानासाहेब गोरे यांनी काकासाहेब गाडगीळ यांचा पराभव केल्यानंतर आणि काकासाहेब गाडगीळ हे वल्लभभाई पटेल यांच्या गोटात असल्यामुळे नेहरूंना ते नको होते. म्हणून नेहरूंनी त्यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून नेमणूक केली. नंतर हळूहळू काकासाहेब गाडगीळ यांची लोकप्रियता कमी होऊ लागली. आणि १९६६ मध्ये काकासाहेब गाडगीळ यांचे निधन झाले. नंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांना राज्यसभेचे सभासद नियुक्त करण्यात आले.
बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ राज्यसभेचे खासदार झालेले होते. नंतर मात्र पुण्यामधून ते निवडून लोकसभेवर काँग्रेस पक्षातर्फे आले. १९७६ सालामध्ये आणीबाणी असल्यामुळे आणीबाणी उठल्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत मात्र बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचा पराभव झाला आणि मोहन धारिया निवडून आले. विठ्ठलराव वकील होते. पण त्यांचा देश-विदेशातील घटनांचा अभ्यास चालू होता. त्यानंतर मात्र विठ्ठलराव गाडगीळ पुणे मतदारसंघातून लोकसभेला पाच वेळा निवडून गेले. ही एक हॅट्ट्रिक होती. इतिहास त्यांनी निर्माण केला.
माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून त्यांनी फार मोठी कामगिरी केली. १९७२ मध्ये त्यांनी दूरदर्शन सुरू केले. अतिशय अभ्यासू खासदार म्हणून त्यांची लोकप्रियता वाढत होती. नेहमी पार्लमेंटच्या लायब्ररीत बसून टिपणे काढणे आणि अभ्यासपूर्ण माहिती आणि उत्तरे देणे यामध्ये बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचा हातखंडा होता. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचा जगामधल्या कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भामध्ये गाढा अभ्यास होता. म्हणून त्यांनी संसद मार्ग लोकशाहीचा मार्ग हा ग्रंथ लिहिला. विविध घटनांचे विवेचन आणि विश्लेषण करण्यात विठ्ठलरावाचा हातखंडा होता. ज्या ज्या वेळेला घटनेच्या संदर्भामध्ये एखादा पेचप्रसंग निर्माण होत असे, त्या वेळेला बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ नेमका सल्ला देत.
इंदिरा गांधींच्या खुनानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ माहिती आणि प्रसारण मंत्री होते. इंदिरा गांधींना अटक झाल्यानंतर बॅरिस्टर विठ्ठलरावांनी नाना पेठेतून लक्ष्मी रोडने निषेध मोर्चा काढला होता. त्यानंतर मात्र एकदम नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री झाले.
नरसिंहरावांच्या कारकिर्दीमध्ये ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते झाले. त्यांच्या पत्रकार परिषदा अतिशय गाजलेल्या, अभ्यासपूर्ण असायच्या. आदर्श पत्रकार परिषदा कशाला म्हणावं, तर त्या विठ्ठलराव गाडगीळ यांच्या पत्रकार परिषदा होय. खरा संसदपटू, नर्मविनोदकार, अभ्यासू खासदार, लोकप्रिय मंत्री, दूरदर्शन सुरू करणारा मंत्री आणि घटनात्मक पेच सोडवताना सल्ला देणारा काँग्रेसचा नेता २५ फेब्रुवारी २००१ मध्ये कालवश झाला. त्यामुळे देशोदेशींचा घटनात्मक अभ्यासक गेल्याची खंत काँग्रेसमधल्या जाणकारांना आहे.
बऱ्याच वेळेला डेक्कन क्वीनने मुंबईला जाताना बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ आणि मी एकत्रच प्रवास केलेला आहे. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ माहिती आणि प्रसारण मंत्री असताना दिल्लीमध्ये वीज यांच्या घरी राहिलेलो आहे. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्या हस्ते नवयुग समाचार या माझ्या पत्नीने चालविलेल्या सायंदैनिकाचे प्रकाशन त्यांनी केलेले आहे.
बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचा २५ फेब्रुवारीला स्मृतिदिन आहे. त्यांना भावांजली.
- ॲड. बाबूराव कानडे