शुक्रवारी दुपारी १ वाजता डेक्कन परिसरातील बाबा भिडे पुलाखाली मगर दिसल्याची अफवा पसरली. त्यामुळे नागरिकांची तिथे गर्दी झाली. गर्दी वाढल्याने त्याचे फोटोही सोशल मीडियावर वेगाने पसरले. त्यामुळे ‘भिडे पुलाखाली मगर ? कशी काय आली ? कुठून आली ? ? ?’ असे अनेक प्रश्न पुणेकर विचारत होते.
दुपारची वेळ पुणेकरांच्या झोपेची असते, त्यामुळे कुठून तरी मुठेत पोहत आली असणार ? अशा प्रकारचे विनोदही एकमेकांना पाठविले जात होते. दरम्यान, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि रेस्क्यू टीमने मगरीला शोधण्यासाठी जंग जंग पछाडले, पण मगर काही दिसली नाही. मुठेच्या पात्रातील कचरा मगरीसारखा दिसल्याने कदाचित ती आल्याची अफवा पसरली आणि एकच गोंधळ झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
———————-
दुपारी १ वाजता कोणी तरी भिडे पुलाखाली कचऱ्यात मगर दिसल्याचे सांगितले आणि त्याची माहिती सर्वांपर्यंत पोचली. मलाही रेस्क्यूसाठी कॅाल आला होता. मी लगेच पुलाजवळ गेलो. पण खूप शोधले, मगरीचा काही पत्ता लागला नाही. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व शोध घेत होते. भिडे पुलाखाली मगर कशी येईल, कदाचित कचऱ्यात तशी प्रतिमा कोणाला तरी दिसली आणि सर्व गोंधळ उडाला.
- आनंद अडसुळ, वाइल्ड ॲनिमल अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटी
————————
आज भिडे पुलाजवळ मगर दिसल्याची माहिती आम्हाला वनविभागाला मिळाली. सकाळपासुन नुकत्याच स्थापन केलेल्या रॅपिड रिस्पॉन्स टीम व RESQ या संस्थेचे प्रतिनिधी यांच्या समवेत आम्ही त्या मगरीची सुटका करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्याकरिता उपाययोजना केल्या. त्याकरिता पिंजरे, नेट (जाळ्या) या सहाय्याने मगरीला पकडण्याचे नियोजन केले. परंतु सायंकाळी सात वाजेपर्यंत या मगरीचे फोटोग्राफिक पुरावे आम्हाला मिळालेले नाहीत. तरी आम्ही आमचे प्रयत्न आज रात्री व उद्याही सुरु ठेवत आहोत.
- राहुल पाटील, उपवनसंरक्षक पुणे
—————-