चाकण (जि. पुणे) : चाकणजवळील आळंदी फाट्यालगत असलेल्या एका हॉटेलच्या स्वच्छतागृहात नीलेश गायकवाड (वय ३२, रा. कोंढवा) या तरुणाने विष घेऊन आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा प्रसिद्ध उद्योजक बाबा कल्याणी यांचा मुलगा अमित कल्याणी यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी याविषयी माहिती दिली. नीलेश गायकवाड याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अमित कल्याणी यांचे नाव लिहिलेले आहे. गायकवाड हा कोंढवा येथील कल्याणी स्टील कंपनीत वरिष्ठ अकाउंटंट या पदावर नोकरीला होता. चिठ्ठीत लिहिल्यानुसार, अमित कल्याणी यांना १५ कोटी रुपये उभे करण्यासाठी त्याने मदत केली होती.त्यातील साडेअकरा कोटी रुपये नीलेशने त्यांच्याकडून उधार घेतले होते, ते परत केले होते. या व्यवहारासाठी नीलेशला कल्याणी यांनी ६० लाखांचे कमिशन देण्याचे मान्य केले होते.मात्र हे कमिशन देण्यास कल्याणी टाळाटाळ करीत असल्याचा उल्लेख चिठ्ठीत आहे. मानसिक तणावाखाली असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत़
आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योजक बाबा कल्याणी यांचा मुलगा अमित कल्याणींवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:31 AM