कोरेगाव भीमा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलेले आहे. सध्या बाबासाहेबांची संविधानिक व्यवस्था संपविण्याचा डाव देशात चाललेला आहे. देशात चाललेला हा प्रयत्न आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पाटोले यांनी सांगितले. कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी नाना पटोले आले होते.
पटोले म्हणाले, ऐतिहासिक विजयस्तंभ या ठिकाणी शौर्यदिन साजरा करण्यासाठी देशभरातून लोक येत असतात. या ठिकाणी त्या काळाच्या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात बहुजनांनी जे शौर्य दाखवलं, थोड्या सैन्यामध्ये मोठ्या संख्येतील सैन्यांना धाराशाही केले, अशा शौर्य दिनाला मानवंदना करण्यासाठी येत असतात. या विजयस्तंभावर आम्ही हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज येथे पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. येथे आल्यानंतर आमच्या बहुजनांनी जे शौर्य दाखवले, त्यांचे विचार घेऊन आम्ही जाणार आहोत. बाबासाहेबांची संविधानिक व्यवस्था संपविण्याचा डाव देशात चाललेला असून, हा प्रयत्न आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नाही.
निर्दोष लोकांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार
''२०१८ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत बोलताना, पहाटेचे सरकार बनले, ते पहाटेचे सरकार तातडीने बदलले. महाराष्ट्र पोलिसांकडे असलेला येथील तपास महाराष्ट्र पोलिसांकडून केंद्रीय तपास यंत्रणेकडे गेला. त्यामुळे मागील गुन्हे मागे घेण्यामध्ये अडचणी येत आहेत. आम्ही त्याचा पाठपुरावा करत असून, निर्दोष लोकांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पटोले म्हणाले.''