पुणे : राजा ढाले नावाप्रमाणे राजा होते. उदार हस्ताने कोणाही गरजूला मदत करायचे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोळसपणे स्वीकारले व आचरणातही आणले होते. विचारांबरोबर कोणी प्रतारणा केली की त्यांना ते मुळीच आवडायचे नाही. एका मोठ्या मनाच्या व्यक्तीला आपण मुकलोआहोत, असे प्रतिपादन माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी केले.गायकवाड म्हणाले, १९७२ पासून त्यांचे माझे निकटचे संबध होते. ‘साधना’तील त्यांच्या एका लेखासंदर्भात उजव्या विचारांच्या लोकांनी साधना कार्यालयावर मोर्चा आणला होता. त्याला उत्तर देताना मीही काहीजणांना बरोबर घेऊन मोर्चा काढला. माझ्या जीवनातील तो पहिला मोर्चा, त्यावेळी भाषणही केले. राजा ढाले यांनी सगळ्याचे कौतूक केले. माझ्या मित्रपरिवालाही त्यांनी शाबासकी दिली. त्यानंतर अगदी कालपरवापर्यंत त्यांच्याशी बोलणे होत होते.दलित पँथरला त्यांनी वैचारिक बैठक दिली. त्यांनी फार कमी लिहिले, मात्र जे लिहिले ते अगदी स्पष्ट सडेतोड. तडजोड त्यांच्या स्वभावात नव्हती. त्यामुळेच नामदेव ढसाळ यांच्याबरोबर त्यांचे मतभेद झाले. नामदेव मार्क्सवादी व हे पूर्ण बुद्धवादी. राजकीय फायद्यासाठी म्हणूनही त्यांनी कधी विचार सोडला नाही. कायम विचारांना चिकटून राहिले. त्यामुळे त्यांचा व्हावा तसा सन्मान झाला नाही, मात्र त्यांना त्याची खंत नव्हती. जे केले ते पूर्ण समाधानाने व पटले म्हणूनच केले असे ते म्हणत.प्रा. मनोहर जाधव हेही ढाले यांच्या आठवणींनी सद््गदीत झाले होते. इयत्ता ६ वीत असताना त्यांचे भाषण ऐकले. काही कळण्याचे ते वय नव्हते, मात्र त्यांची त्या वेळी पडलेली छाप नंतर जवळचा स्नेहसंबध आल्यावरही कायम राहिली. ते अभ्यासपूर्ण मांडणी करत असत. त्यामागे चिंतन असे. अनियतकालिकांच्या चळवळीत त्यांनी बरेच योगदान दिले. त्यात चक्रवर्ती, धर्मनीती अशा काही अनियतकालिकांचा समावेश करावा लागेल. खेळ या नियतकालिकात त्यांची एक प्रदीर्घ मुलाखत मी घेतली होती. त्यात त्यांनी त्यांच्या कारकिर्दीचे बरेच पदर उलगडून दाखवले होते. ते एक चांगले कवी होते हे फारच थोड्या जणांना माहिती असेल, असे जाधव यांनी सांगितले.
बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 5:58 AM