कळस: रुई (ता. इंदापूर) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बाबीर देवाच्या यात्रेला आज मंगळवारी प्रारंभ झाला. सकाळी गावातून देवाचा भव्यदिव्य पालखी सोहळा पार पडल्यानंतर घट उद्यापन करण्यात आले. यात्रेसाठी हजारो भाविक बाबीरनगरीत दाखल झाले असून नगरी भक्ती रसात चिंब झाली आहे. तीन दिवस भरणाऱ्या यात्रेचा बुधवार (दि १५) हा मुख्य दिवस आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे चार लाखांहून अधिक भाविक या यात्रेसाठी हजेरी लावत असतात. यामुळे यात्राकाळात भाविकांच्या दृष्टीने अनेक उपयायोजना करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत, यात्रा समिती व देवस्थान ट्रस्ट, पोलीस यंत्रणा व प्रशासनाच्या माध्यमातून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही येथे भव्य गजढोल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी भाविक नवसाची परतफेड करण्यासाठी व देवदर्शनासाठी लाखोंच्या संख्येने हजेरी लावतात. गुरूवारी (ता. १६) नवसाच्या बगाडाचा, पकाळणी भाकणूकीचा कार्यक्रम होईल. यात्रेनिमित्त सध्या मंदिर सुशोभिकरण, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. यात्रेत घोंगडी बाजारपेठ मोठी भरली आहे तसेच भाविकांनी यात्रा फुलून गेली आहे. राजकीय रेलचेल
यात्रेच्या मुख्य दिवशी बुधवारी बाबिर भक्तांचा मेळावा पार पडणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार दतात्रय भरणे, गोपीचंद पडळकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राम शिंदे उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा व विधासभेच्या दृष्टिने राजकीय रेलचेल महत्वाची ठरणार आहे.