पुणे : एकाच कंपनीत काम करीत असताना दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. ते दोघेही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात होते. त्यांच्या प्रेमसंबंधातून जन्माला आलेल्या बाळाला आश्रमात ठेवतो असं सांगून तेरा दिवसांच्या बाळाला तो घेऊन गेला. मात्र बाळाच्या जीवाचं बरं वाईट केल्याचा तिचा संशय असल्याने तिनं पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी दोघांना मुंढवा पोलिसांनीअटक केली आहे.
शुभम महेश भांडे ( वय 23 रा. स.नं 48/3 गणेशनगर गल्ली नं 4 वडगाव शेरी) आणि योगेश सुरेश काळे (वय 26 रा. स .नं 143 मारुती निवास धावटे वस्ती, मांजरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
शुभम आणि तरुणी दोघ 2017 मध्ये खराडीच्या एका कंपनीत कामाला होते. एकत्र काम करीत असल्याने दोघांची ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघेही लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहात असताना 2018 ला ती गर्भवती राहिली. तिने 2019 मध्ये बाळाला जन्म झाला. शुभमने तिला आपल्या आयुष्याचा विचार कर. आपण बाळाला आश्रमात ठेवू असं म्हटला. तो बाळाला घेऊन गेला.
ती वेळोवेळी विचारायची तेव्हा तो आश्रमात ठेवले म्हणायचा. पण तिला त्याचा संशय आल्याने तिने पहिल्यांदा चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला होता. या घटनेला अडीच वर्षे झाली आहेत. आरोपी योगेश काळे हा शुभमचा मित्र होता. बाळ आश्रमात नेताना तो शुभम च्या बरोबर होता. दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याचे मुंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे यांनी सांगितले.