थेऊर: कुंजीरवाडी गावच्या हद्दीत असणारा बेबी कालवा पाझरू लागला होता. त्याचे पाणी परिसरात साचल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्या आशयाचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पाटबंधारे विभागाने कालव्याच्या साफसफाईस सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
बेबी कालवा पाझरू लागला होता. कालव्याला लागूनच लोकवस्ती व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा असून, या कालव्याचे पाझरलेले पाणी शेजारील शाळेच्या आवारात व स्थानिकांच्या घरामध्ये घुसत होते. त्यामुळे तेथील नागरिक त्रस्त होते. यासंदर्भात, पाटबंधारे विभागाकडे वारंवार तक्रार करूनही अधिकारी दुर्लक्ष करत होते. त्यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पाटबंधारे विभागाने त्वरित कालव्यात साचलेला गाळ व जलपर्णी साफ केल्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरू झालेला आहे. परंतु प्रत्येकवेळी तात्पुरत्या स्वरूपाची ही अंमलबजावणी कामाची नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून त्वरित कायमस्वरूपीचा तोडगा यावर काढला जावा. तसेच, कालव्यात प्रक्रिया केलेले सांडपाणी सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली. या वेळी पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियांत्रिक दोरगे, तसेच कालवा निरीक्षक भाऊसाहेब हरपळे उपस्थित होते.
पुढील तीन ते चार दिवसांत कालव्यातील कचरा व जलपर्णी पूर्णपणे साफ करणार आहोत. तसेच पंधरा नंबर ते लोणी काळभोर दरम्यान कालवा अस्तरीकरण व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला आहे, पुढील काही दिवसांत सदरील कामास सुरुवात होईल.
विजय पाटील
(कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे)
०३
बेबी कालव्याची साफसफाई करताना पाटबंधारे विभागाचे कर्मचारी