लोकमत न्यूज नेटवर्कउरुळी कांचन/ कोरेगाव मूळ : जुना मुठा-मुठा कालव्यामध्ये (बेबी कालवा) मुंढवा येथील जॅकवेलमधून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कालवा परिसरातील शेतकरी व रहिवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जादा पाणी वाहून नेण्याची क्षमता नसतानादेखील दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल हवेली तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता आपल्या तालुक्याला पाणी नेण्याचा अट्टहास करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. हवेली व दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळावे, या हेतूने सुमारे चाळीस वर्षांपासून बंद असलेला बेबी कालवा मागील दोन वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. कालवा सुरू करीत असताना कालव्याची संपूर्ण दुरुस्ती करणे जरुरीचे होते. यामध्ये कालव्याच्या आतील बाजूस वाढलेले गवत काढणे, कमी-अधिक उंची असलेल्या कालव्यांच्या भरावाची दुरुस्ती करणे व कालव्याच्या ठिकाणच्या सर्व पुलांची उंची वाढविणे अपेक्षित होते. मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत खडकवासला पाटबंधारे विभागाने घाईघाईने कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने सुरुवातीच्या काळात कमी दाबाने पाण्याचा प्रवाह असल्याने पाणी व्यवस्थित हवेली तालुक्याच्या हद्दीपर्यंत पोहोचले. काही कालावधीनंतर जॅकवेलच्या पंपांची संख्या वाढविल्याने कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी कालवा परिसरात पाझरू लागले. लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी व उरुळी कांचन गावांच्या हद्दीमध्ये कालवा कालवा गळतीचे प्रमाण वाढू लागले. त्यातच क्षमतेपेक्षा जादा पाणी कालव्यात सोडल्याने मंगळवारी (दि. २३) लोणी काळभोर येथील तरवडी-रानमळा परिसरात कालवा फुटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशाच प्रकारे अनेकदा कालव्याच्या गळतीचे प्रकार वारंवार घडत आहेत. या सर्वांची कल्पना शेतकरी व ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाला दिली. मात्र पाटबंधारे विभागाकडून त्यावर ठोस कारवाई झाली नाही. बुधवारी (दि. २४) कालव्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी कालव्यामध्ये सोडण्यात आल्याने पुन्हा अनेक ठिकाणी कालव्याचे पाणी नागरी वस्ती, शेतामध्ये व रस्त्यांवर वाहताना दिसत होते. सोरतापवाडी येथील माजी उपसरपंच गणेश चौधरी यांनी सांगितले, की कालव्यामधून जड पाणी सोडण्यात आल्याने गावामध्ये अनेक ठिकाणी नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. अनेक मजुरांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांना घरामध्ये राहणे कठीण झाले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व घटनेची माहिती देऊनदेखील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बेबी कॅनॉलच्या पाण्याचा हवेलीला फटका
By admin | Published: May 25, 2017 2:57 AM