उरुळी कांचन : खडकवासला पाटबंधारे विभागाच्या बेबी कालव्यातून (जुन्या) वाहणारे घाण पाणी जलपर्णीमुळे अडून कालव्याच्या बाहेर पडून पांढरस्थळवस्तीजवळील मांग गारुडी वस्तीवरील घरात शिरले आहे. या कालव्याचा भराव ठिसूळ झालाय त्यातून पाणी पाझरत आहे की, कोठून पाणी पाझरते, यामुळे या कालव्याशेजारी असलेल्या वस्तीत, शेतात, शाळेत किंवा रस्त्यावर पाण्याची डबकी साचली आहे. आमदार बाबूराव पाचर्णे यांनी कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी कमी करण्यात यावे, यासाठी पत्रव्यवहार करूनही अधिकाऱ्यांनी त्याकडेही दुर्लक्ष केले आहे.
‘बेबी कालवा फुटण्याचा धोका’ अशा आशयाची बातमी ‘लोकमत’ने नुकतीच प्रसिद्ध केली होती. कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन येथील पाटीलवस्ती व पांढरस्थळवस्तीजवळील मांगगारुडी वस्ती या भागात पाणी कालव्याच्या काठोकाठ भरून वाहत होते. हे पाणी पाझरत असल्याने कालव्याशेजारील वस्तीमध्ये ते साचले आहे. या पाण्यामुळे या वस्तीमध्ये चिखल साचला आहे. मुठा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता शेलार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मुंढवा जॅकवेलमधून सात पंपांच्या साहाय्याने पाणी सोडण्यात आले आहे. ते कमी करा, असे तेथील अधिकारी उंडे यांना सांगितले. मात्र, अधीक्षक अभियंता चोपडे यांनी सांगितल्यावरच पंप बंद करण्यात येईल अशी त्यांनी भूमिका घेतली. याबाबत अधीक्षक अभियंता चोपडे यांच्याशी संपर्क केला असता कार्यकारी अभियंता शेलार यांना सांगा ते पाणी कमी करण्यास सांगतील, अशी टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली. यामुळे मोठी दुर्घटना घडल्यावर उपाय योजना करणार का, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थांनी केला आहे.‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सहकार्याने जेसीबीद्वारे यवत उपविभागाचे उपअभियंता बनकर यांनी जलपर्णी काही प्रमाणात काढली. मात्र, पाण्याचा प्रवाह व तो वाहून नेणारा कालवा आणि वेगवेगळ्या ठिकाणी कालवा ओलांडण्यासाठी असलेले छोटे पूल यामुळे स्वच्छता करण्यात अडथळा येत होता. कालव्याचे पाणी जागोजागी साचत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. याबाबत लवकर तोडगा न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला.