बारामती : येथील महिला ग्रामीण रुग्णालयात नवजात बालकांसाठी ‘बेबी वॉर्मर’ उपकरण जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी भेट दिले. नवजात शिशूंसाठी अत्यावश्यक असणाऱ्या उपकरणाबरोबरच डिजिटल वजन व फोटोथेरपी संच भेट दिला. त्यामुळे गुंतागुंतीच्या प्रसूतीनंतर नवजात बालकांसाठी येणाऱ्या अडचणी दूर झाल्या.जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी नुकतीच या रुग्णालयाला भेट दिली होती. या रुग्णालयात प्रसूती झालेल्या नवजात बालकाला बेबी वॉर्मरमध्ये ठेवण्यासाठी खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यांनी तातडीने स्व:खर्चातून महिला रुग्णालयाला हे उपकरण भेट दिले. या संदर्भात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई यांनी सांगितले, की या उपकरणामुळे नवजात बालकांसाठी येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत. रोहित पवार म्हणाले, की नवजात शिशूंची काळजी घेणे महत्त्वाचे असते. सर्वसामान्य नागरिकांना खासगी हॉस्पिटलची फी परवडत नाही; म्हणून याच रुग्णालयात सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार म्हणाल्या, की महिला आणि बालक यांचे आरोग्य महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागात महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे असून त्यासाठी रुग्णसेविका, डॉक्टर महिलांनी पुढाकार घ्यावा. तसेच व्यसनमुक्तीवरही काम करणे आवश्यक आहे. डॉ. महेश जगताप म्हणाले, की बेबी वॉर्मरसोबतच फोटोथेरपी युनिट भेट दिल्यामुळे बालकांतील काविळीसारख्या आजाराची लक्षणे ओळखणे सोपे होईल. महिला शासकीय रुग्णालयात हा कार्यक्रम पार पडला.
बारामतीच्या महिला रुग्णालयात ‘बेबी वॉर्मर’
By admin | Published: June 23, 2017 4:35 AM